Champions Trophy 2025 Update: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून खेळवले जाणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिल्याने भारताचे सामने दुबईत खेळवले जातील असा निर्णय आयसीसीने दिला. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारतीय संघाच्या जर्सीवरून नवा गदारोळ सुरू झाला आहे.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव लिहिण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बीसीसीआयने काहीच अधिकृत वक्तव्य दिलेले नाही किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीची जर्सी देखील सादर केलेली नाही. पीसीबीमधील अधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून या चर्चांना उधाण आलं आहे. साधारणपणे सर्व संघांच्या जर्सीवर आयसीसी स्पर्धेचे यजमानपद असलेल्या देशाचे नाव असते, मात्र भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव नसल्यामुळे आता याबाबत गदारोळ सुरू आहे.
पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापण्यास नकार दिल्याचे म्हणत बीसीसीआयवर ‘क्रिकेटमध्ये राजकारण’ आणल्याचा आरोप केला. यापूर्वी, भारतीय बोर्डाने कर्णधार रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कर्णधारांच्या बैठकीसाठी पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता, असे ते म्हणाले. पण बीसीसीआयने मात्र असे कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नव्हते.
पीसीबीने याप्रकरणी भारत आणि बीसीसीआयवर आरोप केले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) एका अधिकाऱ्याने सांगितले की, “बीसीसीआय क्रिकेटमध्ये राजकारण आणत आहे जे खेळासाठी अजिबात योग्य नाही. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला. त्यांना ओपनिंग सेरेमनीसाठी त्यांचा कर्णधार (रोहित शर्मा) पाकिस्तानला पाठवायचं नाही आणि आता पाकिस्तानचे नाव जर्सीवर (भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर) छापले जाणार नसल्याच्या बातम्या येत आहेत. आम्ही आशा करतो की आयसीसी असं होऊ देणार नाही आणि पाकिस्तानला पाठिंबा देतील.”
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यावर बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. सरतेशेवटी, पाकिस्तान बोर्डाला भारताच्या अटी मान्य कराव्या लागल्या. तर नवीन करारामुळे भविष्यातही पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आयसीसी स्पर्धांसाठी आपला संघ भारतात पाठवणार नाहीत, भारताकडे आयसीसी स्पर्धेचे यजमानपद असताना पाकिस्तानचे सामनेही वेगळ्या ठिकाणी खेळवले जातील.