Pat Cummins set to miss Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व ८ संघही जाहीर झाले आहेत. या संघांत १२ फेब्रुवारीपर्यंत बदल करता येऊ शकतात. आता चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणे खूप कठीण मानले जात आहे. ज्याचे प्रमुख कारण समोर येत आहे.
भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिका संपल्यानंतर पॅट कमिन्स क्रिकेटपासून दूर आहे. त्यानंतर तो कांगारू संघाच्या श्रीलंका दौऱ्यावरही गेला नाही. या दौऱ्यावर न येण्यामागचे एक कारण म्हणजे त्याचे दुसऱ्यांदा वडील होणे हे होते. मात्र, पॅट कमिन्सला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या घोट्याच्या दुखापतीचा त्रास पुन्हा होत आहे. त्यामुळे त्याने गोलंदाजी करायला सुरुवात केलेली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकाने दिली माहिती –
ऑस्ट्रेलिया संघाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड म्हणाले, “पॅट कमिन्स कोणत्याही प्रकारची गोलंदाजी सुरू करू शकला नाही. त्यामुळे त्याचे खेळवणे जवळजवळ अशक्य आहे, याचा अर्थ आम्हाला एका कर्णधाराची गरज आहे”. प्रशिक्षकाच्या माहितीनुसार कर्णधार पॅट कमिन्स अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही, त्यामुळे त्याने गोलंदाजी सुरू केलेली नाही.
कमिन्स श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळत नाही –
ऑस्ट्रेलियन संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया १-० ने आघाडीवर आहे. या मालिकेत पॅट कमिन्सही ऑस्ट्रेलिया संघाचा भाग नाही. त्यामुळे स्टीव्हन स्मिथ श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व करत आहे. वास्तविक, कमिन्स त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता.
स्मिथ किंवा हेड ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद स्वीकारू शकतात –
पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळला नाही तर ऑस्ट्रेलियन संघाला नवीन कर्णधाराची घोषणा करावी लागेल. सध्या या शर्यतीत दोन नावे आघाडीवर आहेत, त्यापैकी एक नाव स्टीव्ह स्मिथ आणि दुसरे नाव सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचे आहे. सध्या, स्टीव्हन स्मिथ श्रीलंका दौऱ्यावर खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे, ज्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कर्णधारापदाची जबाबदारी सांभाळू शकतो. ऑस्ट्रेलियन संघ लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर २२ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला जाणार आहे.