Champions Tropy Prize Money: दुबईमध्ये झालेल्या यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या विजेतेपदानंतर भारतीय क्रिकेट संघावर करोडो रुपयांचा वर्षाव होणार आहे. तर उपविजेता न्यूझीलंड संघही मालामाल झाला आहे. यापूर्वी, भारतीय संघाने २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. आता कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालीही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तर २००२ मध्ये, भारत या स्पर्घेचा संयुक्त विजेता ठरला होता.
भारतीय संघाला १९.५ कोटी रुपये
चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, विजेत्या भारतीय संघाला १९.५ कोटी रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या उपविजेत्या न्यूझीलंडला संघाला ९.७५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. यानंतर, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी ४.८५ कोटी रुपये दिले जातील. स्पर्धेत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना ३ कोटी रुपये, तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघांना १.२ कोटी रुपये बक्षीस दिले जाईल.
भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन
भारतीय संघाचा तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सलग अंतिम सामना होता. याआधी २०१३ मध्ये भारताने इंग्लंडला हरवून ट्रॉफी जिंकली होती, परंतु २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारताने न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी तिनदा जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाने २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयुक्त विजेतेपद जिंकले होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाने दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत न्यूझीलंडला २५१/७ धावांवर रोखले. भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः फिरकीपटू कुलदीप यादव (२/४०) आणि वरुण चक्रवर्ती (२/४५) यांनी या अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. न्यूझीलंडकडून मिचेलने १०१ चेंडूत सर्वाधिक ६३ धावा केल्या, तर मायकेल ब्रेसवेल, रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी अनुक्रमे नाबाद ५३, ३७ आणि ३४ धावांचे योगदान दिले. तर भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ७६ आणि श्रेयस अय्यरने ४८ धावा केल्या.