लाहोर : भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत खेळल्याने तेथील परिस्थिती आणि खेळपट्ट्यांची त्यांना पुरेशी कल्पना आली आहे. ते अचूक योजनेसह खेळत असून अंतिम फेरीच्या दृष्टीने भारतीय संघ एक पाऊल पुढे आहे असे म्हणता येऊ शकेल. मात्र, आम्हीही पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरू, असे वक्तव्य न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यम्सनने केले.
चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद पाकिस्तानकडे असले, तरी भारताचे सर्व सामने दुबई येथे खेळवले जात आहे. भारतीय संघाने अंतिम फेरी गाठल्याने आता जेतेपदाची लढतही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. रविवारी होणाऱ्या या लढतीत भारतासमोर तुल्यबळ न्यूझीलंडचे आव्हान असेल. भारताने आतापर्यंत चारही लढती जिंकल्या असून यात न्यूझीलंडवरील विजयाचाही समावेश आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेतील आपले चारपैकी तीन सामने पाकिस्तानात खेळले आहेत. बुधवारी लाहोर येथे झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने विक्रमी धावसंख्या उभारत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. मात्र, अंतिम लढत दुबईत खेळावी लागण्याबाबत विल्यम्सनला कोणतीही तक्रार नाही.

‘‘भारतीय संघाने आता सलग चार सामने दुबईत खेळले आहेत. त्यामुळे तेथे कसे खेळायचे याची त्यांना पुरेशी कल्पना आली आहे. मात्र, आमच्याबाबतीतही हेच म्हणू शकतो. आम्ही अलीकडच्या काळात पाकिस्तानात बरेच सामने खेळले. लाहोर येथे खेळण्याचा आम्हाला अनुभव होता. याचा आम्हाला उपांत्य फेरीत फायदा झाला असेही म्हटले जाऊ शकते. मात्र, हा खेळाचा भागच आहे. तुम्ही तक्रार करत राहणे योग्य नाही,’’ असे विल्यम्सन म्हणाला.

‘‘भारताने सर्व सामने एकाच मैदानावर खेळले याबाबत आम्ही काहीच करू शकत नाही. पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करणे इतकेच आमच्या हातात आहे. सामन्याचे ठिकाण, प्रतिस्पर्धी या सर्व गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या असतात. मात्र, आम्ही याआधी दुबईत भारताविरुद्ध सामना खेळला आहे. तेथील परिस्थिती पाकिस्तानपेक्षा वेगळी आहे. परंतु आम्ही भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात ज्या गोष्टी चांगल्या केल्या त्या लक्षात ठेवून अंतिम सामन्याची तयारी केली पाहिजे. आम्ही या सामन्यात पूर्ण तयारीनिशी उतरू हे नक्की,’’ असे विल्यम्सनने नमूद केले.

रचिनमध्ये अलौकिक प्रतिभा

चॅम्पियन्स करंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात केली. विल्यम्सन आणि रचिन रवींद्र या दोघांनीही शतक साकारत न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रचिनचे ‘आयसीसी’च्या स्पर्धेतील हे पाचवे शतक ठरले. त्यामुळे अंतिम सामन्यानंतर विल्यम्सनने रचिनचे कौतुक करताना ‘अलौकिक प्रतिभा असलेला खेळाडू’ असे संबोधले. ‘‘रचिनबरोबर फलंदाजी करताना नेहमीच मजा येते. तो संघाच्या यशाला प्राधान्य देतो. तो मोकळेपणाने फटकेबाजी करतो. हीच गोष्ट त्याला खूप खास बनवते. त्याच्यात खूप आत्मविश्वास आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपल्यातील अलौकिक प्रतिभा वारंवार दाखवून दिली आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे,’’ असे विल्यम्सन म्हणाला.

पाकिस्तानच्या तुलनेत दुबईतील परिस्थिती निश्चितपणे वेगळी आहे. मात्र, मोठ्या स्पर्धांत खेळताना तुम्हाला वेगवेगळ्या परिस्थितीसाठी तयार राहावेच लागते. भारताविरुद्ध दुबईत सामना खेळण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि हे आमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. त्या सामन्यात केलेल्या चांगल्या गोष्टी पुढे घेऊन जाणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारताचा संघ खूप मजबूत आहे. ते अप्रतिम क्रिकेट खेळत आहेत. मात्र, अंतिम लढतीत काहीही होऊ शकते. केन विल्यम्सन

खेळपट्टीशी जुळवून घेणे आवश्यक रचिन

भारताविरुद्धच्या अंतिम लढतीत यश मिळवायचे झाल्यास आम्हाला दुबईतील खेळपट्टीशी लवकरात लवकर जुळवून घ्यावे लागेल, असे मत न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज रचिन रवींद्रने व्यक्त केले. ‘‘दुबईतील खेळपट्टी नक्की कशी असणार याची आम्हाला कल्पना नाही. आम्ही भारताविरुद्ध साखळी सामना खेळलो, तेव्हा खेळपट्टी फिरकीला अनुकूल होती. मात्र, दुबईतील गेल्या सामन्यात (भारत वि. ऑस्ट्रेलिया) चेंडू फारसा वळत नव्हता. पुढील दोन दिवस आम्ही खेळपट्टीवर बारीक लक्ष ठेवू. या खेळपट्टीकडून फलंदाज आणि गोलंदाजांना सारखीच मदत मिळेल अशी आशा आहे,’’ असे रचिन म्हणाला.

Story img Loader