Champions Trophy 2025 Aakash Chopra on Yuzvendra Chahal : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाची घोषणा होऊन अनेक दिवस उलटले तरीही चर्चा सुरूच आहे. काहींना करुण नायरची चिंता आहे, काहींना संजू सॅमसन आणि मोहम्मद सिराज संघात नसल्याची चिंता आहे, तर काहींना सूर्यकुमार यादवला संघात न घेतल्याने राग आहे. दरम्यान, आता युझवेंद्र चहलच्या संदर्भात एक विधान समोर आले आहे, ज्यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे समालोचक आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे की बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने चहलचे करियर खराब केले.
आकाश चोप्राने म्हटले आहे की युझवेंद्र चहलची कारकीर्द कोणत्याही कारणाशिवाय संपुष्टात आली, युझवेंद्रला दोन वर्षांपूर्वी संघातून वगळण्यापूर्वी त्याचा वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगला होता. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्राने भारताच्या एकदिवसीय संघाबद्दल सांगितले आणि म्हणाला की खराब कामगिरी न करता युझवेंद्र चहलला संघातून वगळण्यात आले.
आकाश चोप्रा काय म्हणाला?
माजी आकाश चोप्रा क्रिकेटपटू म्हणाला, “युझवेंद्र चहलची कारकीर्द पूर्णपणे संपली आहे. त्याची फाईल बंद करण्यात आली आहे. मला माहित नाही की संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय यांनी असे का केले? हे एक मनोरंजक प्रकरण आहे. तो शेवटचा जानेवारी २०२३ मध्ये खेळला होता. त्यामुळे आता दोन वर्षं झाली आहेत. त्याने या फॉरमॅटमध्ये सातत्याने शानदार कामगिरी केली आहे.”
हेही वाचा – Champions Trophy: भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी जर्सीवर पाकिस्तानचं नाव असणार की नाही? ICC ने स्पष्टच सांगितलं
युझवेंद्र चहलची फाईल दोन वर्षांपासून बंद –
७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये १२१ विकेट्स घेणारा चहल ऑगस्ट २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. युजवेंद्र चहल कुटुंबिक कारणास्तव विजय हजारे ट्रॉफीत सहभागी झाला नव्हता. अशा परिस्थितीत आकाश चोप्राने म्हटले आहे की, जर तुम्ही दोन वर्षांपासून संघाबाहेर असाल तर तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या दावेदारांमध्ये असू शकत नाही. तो म्हणाला, “युझवेंद्र चहलची फाईल दोन वर्षांपासून बंद असल्याने, येथेही युजीसाठी जागा नाही. कारण तुम्ही अचानक त्याची निवड करताच, हे प्रतिगामी पाऊल म्हणून पाहिले जाईल.”