Champions Trophy 2025 Semi Final: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवली जात आहे. एकीकडे या स्पर्धेचे सामने पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळले जात आहेत, तर भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमधील दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले जात आहेत. यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील चारही संघ निश्चित झाले असून भारताविरूद्ध सेमीफायनल खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ दुबईला रवाना होणार आहेत. पण दोन्ही संघ दुबईत का दाखल होणार आहेत? जाणून घेऊया.

भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असून त्याचा उपांत्य सामना ४ मार्च रोजी दुबईत होणार आहे. पण संघ कोणाविरूद्ध खेळणार? यावर अद्याप निर्णय झालेला नाही. भारताचा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेशी होऊ शकतो.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा एक उपांत्य सामना ४ मार्च रोजी दुबईमध्ये खेळवला जाईल आणि दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी लाहोरमध्ये खेळला जाईल. आतापर्यंत ‘अ’ गटातून भारत, न्यूझीलंड आणि ‘ब’ गटातून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, ग्रुप ब मधून पात्र ठरलेले दोन्ही संघ – ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका -शनिवारी दुबईला जातील.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही संघांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून त्यांना दुबईमध्ये ४ मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळू शकेल. फक्त एक संघ तिथे राहील आणि दुसरा संघ दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानला परतेल. भारताविरूद्ध कोणता संघ उपांत्य फेरीत खेळणार हे २ मार्चनंतरच कळेल. भारतीय संघ आता २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यामुळे गुणतालिकेत कोणता संघ अव्वल असेल हे ठरेल.

Story img Loader