वृत्तसंस्था, रावळपिंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घरच्या मैदानांवर खेळताना चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद राखण्याचे पाकिस्तान संघाचे स्वप्न धुळीस मिळाले. सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागल्याने पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता केवळ स्पर्धेची विजयी सांगता करणे इतकेच पाकिस्तानच्या हातात असून त्यासाठी त्यांना आज, गुरुवारी होणाऱ्या लढतीत बांगलादेशला नमवावे लागेल.

या स्पर्धेत प्रत्येक संघाला केवळ तीन साखळी सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यामुळे एक पराभवही महागात पडणार हे संघांना ठाऊक होते. या दडपणाखाली पाकिस्तानचा संघ आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरला. पाकिस्तानला आधी न्यूझीलंड, मग पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे स्पर्धेला सुरुवात झाल्याच्या पाच दिवसांतच यजमानांचे आव्हान संपुष्टात आले. नाराज झालेल्या चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी पाकिस्तानातील क्रिकेट व्यवस्थेत मोठ्या बदलांची मागणी केली आहे.

अन्य संघ आक्रमक शैली आणि निडरपणे खेळण्यास प्राधान्य देत असताना पाकिस्तानचा संघ मात्र जुन्या पद्धतीतच अडकून पडला आहे. आघाडीचे फलंदाज सुरुवातीच्या षटकांत सावध खेळास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले.

दुसरीकडे, बांगलादेशच्या संघानेही निराशाजनक कामगिरी केली आहे. फिरकी गोलंदाजांविरुद्ध धावांचा वेग राखण्यात बांगलादेशचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. बांगलादेशचेही आव्हान संपुष्टात आले आहे.

बाबरला सूर गवसणार?

पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीमागे प्रमुख फलंदाज बाबर आझमला सूर न गवसणे हेसुद्धा महत्त्वाचे कारण आहे. सलामीला येणाऱ्या बाबरने न्यूझीलंडविरुद्ध ६४ धावांची खेळी केली, पण त्यासाठी तो ९० चेंडू खेळला. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली. त्यानंतर भारताविरुद्ध तो २३ धावा करून बाद झाला. आता बांगलादेशविरुद्ध कामगिरीत सुधारणा करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

पुन्हा पावसाचा व्यत्यय

रावळपिंडी येथे मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यावरही पावसाचे सावट आहे. सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता ८८ टक्के इतकी वर्तविण्यात आली आहे.

● वेळ : दुपारी २.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २, स्पोर्टस १८-१, जिओहॉटस्टार अॅप.