एक्स्प्रेस वृत्तसंस्था, पीटीआय
नवी दिल्ली/लाहोर : भारतीय संघ पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) पत्र लिहिले असून सुरक्षेच्या कारणास्तव आपण हा निर्णय घेतल्याचे कळविले आहे. शिवाय भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळविण्याची मागणीही ‘बीसीसीआय’ने केल्याचे समजते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘आमची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात बदल करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. आम्ही ‘पीसीबी’ला तसे पत्र लिहिले असून भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत हलविण्याची मागणी केली आहे’’, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत क्रिकेटविश्वातील अव्वल आठ संघांचा सहभाग असेल. एकदिवसीय प्रारूपात होणारी ही स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत रंगणार असून सामने कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे नियोजित आहेत. मात्र, पाकिस्तानात न खेळण्यावर ‘बीसीसीआय’ ठाम असून याबाबत त्यांनी सरकारचा सल्लाही घेतल्याचे समजते.

गेल्या वर्षी आशिया चषक एकदिवसीय स्पर्धेचे यजमानपदही पाकिस्तानकडेच होते. भारताने पाकिस्तानात येऊन खेळावे यासाठी यजमानांकडून बरेच दडपण टाकण्यात आले. मात्र, भारताने आपली भूमिका बदलण्यास नकार दिला. अखेर भारताचे सामने श्रीलंकेत हलविणे भाग पडले.

हेही वाचा >>>Sanju Samson Century: संजू सॅमसनने शतकासह घडवला इतिहास, टी-२० इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

मायदेशी परतण्याचाही पर्याय…

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघाने पाकिस्तानात यावे यासाठी ‘पीसीबी’ आग्रही आहे. पाकिस्तानात राहायचे नसल्यास प्रत्येक सामन्यानंतर भारतीय संघ पुन्हा मायदेशी परत जाऊ शकेल, असा पर्यायही ‘पीसीबी’ने सुचवला आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचे चित्र असून येत्या काही दिवसांत ही परिस्थिती अधिकच चिघळण्याची भीती आहे.

आशांवर पाणी?

गेल्या महिन्यात इस्लामाबाद येथे झालेल्या शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीनंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री मुहम्मद इशक दार यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील व दोन देशांतील क्रिकेट सामन्यांना पुन्हा सुरुवात होऊ शकेल अशी आशा निर्माण झाली होती. २०१५ सालापासून दोन देशांतील हा पहिलाच थेट संवाद होता. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी, जे ‘पीसीबी’चे अध्यक्षही आहेत, ते या बैठकीवर लक्ष ठेवून होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने भारतीय संघ चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला जाणार असल्याची कुजबुज सुरू झाली होती. मात्र आता या आशांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions trophy cricket tournament bcci demand to organize matches in dubai sport news amy