पीटीआय, दुबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारांकित फलंदाज विराट कोहलीने (१११ चेंडूंत नाबाद १०० धावा) आपल्या लौकिकाला साजेशी अप्रतिम खेळी केल्याने भारताने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहा गडी राखून मात केली. सलग दुसऱ्या विजयासह भारताचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले असून पाकिस्तानचा संघ साखळीत गारद होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

दुबई येथे झालेल्या या बहुचर्चित सामन्यात पाकिस्तानला २४१ धावांत रोखल्यानंतर भारताने ४२.३ षटकांत ४ बाद २४४ धावा करत विजय साकारला. आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने (१५ चेंडूंत २०) सकारात्मक सुरुवात केली. मात्र, शाहीन शाह आफ्रिदीच्या उत्तम यॉर्करने रोहितला निरुत्तर केले. यानंतर सलामीच्या सामन्यातील शतकवीर शुभमन गिल (५२ चेंडूंत ४६) आणि कोहली यांनी भारताचा डाव सावरला. संथ खेळपट्टी आणि मैदानावर वेगाने धावा करणे अवघड असल्याचे या दोघांनी लक्षात घेतले. त्यांनी एक-दोन धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी रचत भारताला शतक गाठून दिले. फिरकीपटू अबरार अहमदने गिलला त्रिफळाचित करत ही भागीदारी मोडीत काढली. यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यरने (६७ चेंडूंत ५६) कोहलीला सुरेख साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ११४ धावांची निर्णायक भागीदारी रचत भारताला विजयासमीप नेले. श्रेयस बाद झाल्यानंतर कोहलीने औपचारिकता पूर्ण करताना भारताला विजय मिळवून दिला, शिवाय एकदिवसीय कारकीर्दीतील ५१वे शतकही साकारले. कोहलीने आपल्या खेळीत अवघे सात चौकार मारले. उष्ण आणि दमट हवेत त्याने आपल्या उत्कृष्ट तंदुरुस्तीचा दाखला देताना एक-दोन धावा काढून पाकिस्तानी गोलंदाजांवर वर्चस्व राखले.

त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर बाबर आझम (२३) आणि इमाम उल हक (१०) यांना फार काही करता आले नाही. मग सौद शकील (७६ चेंडूंत ६२), कर्णधार मोहम्मद रिझवान (७७ चेंडूंत ४६) व खुशदिल शाह (३९ चेंडूंत ३८) यांच्या खेळीमुळे पाकिस्ताने सन्मानजनक धावसंख्या उभारली. मात्र, भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे पाकिस्तानला धावांचा वेग फार कधी वाढवताच आला नाही.

कोहलीच्या १४ हजार धावा

●चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीदरम्यान भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय कारकीर्दीत १४ हजार धावांचा टप्पा ओलांडला.

●अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर (१८४२६ धावा) आणि कुमार संगकारा (१४२३४ धावा) यांच्यानंतर केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.

●मात्र, हा टप्पा सर्वांत जलद गाठण्याचा विक्रम कोहलीच्या नावे झाला आहे. त्याने केवळ २८७व्या एकदिवसीय डावात १४ हजार धावा पूर्ण केल्या.

●या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सचिनने ३५० डाव, तर संगकाराने ३७८ डाव घेतले होते.

●पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक, आशिया चषक आणि चॅम्पियन्स करंडक या स्पर्धांत किमान एक शतक करणारा कोहलीला क्रिकेटविश्वातील पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच ‘आयसीसी’च्या स्पर्धांत त्याची आता एकूण सहा शतके झाली आहेत.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : ४९.४ षटकांत सर्वबाद २४१ (सौद शकील ६२, मोहम्मद रिझवान ४६; कुलदीप यादव ३/४०, हार्दिक पंड्या २/३१) पराभूत वि. भारत : ४२.३ षटकांत ४ बाद २४४ (विराट कोहली नाबाद १००, श्रेयस अय्यर ५६, शुभमन गिल ४६; शाहीन शाह अफ्रिदी २/७४).

● सामनावीर : विराट कोहली</p>