Fan with Indian flag assaulted & arrested in Lahore stadium by officials in Champions Trophy Video: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथे सर्व संघांचे सामने खेळवले जात आहेत. पण आता पाकिस्तानचा संघ गट टप्प्यातूनच चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. गतवर्षीचा चॅम्पियन संघ यंदा सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला. पण तत्त्पूर्वी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यात धक्कादायक प्रसंग घडला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
लाहोरमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सामन्यादरम्यान एक तरुण भारतीय ध्वज फडकवताना दिसला. सुरक्षा कर्मचाऱ्यांची या तरुणावर नजर पडताच त्यांनी त्यांच्याजवळ पोहोचून तिरंगा जप्त केला. एवढेच नाही तर या तरुणाची कॉलर पकडत त्याला स्टेडियमबाहेर काढण्यात आले. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुण स्टेडियममध्ये भारताचा झेंडा फडकावत आहे. हा व्हिडिओ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी एक तरुण भारतीय ध्वज फडकवताना दिसला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणापर्यंत पोहोचून त्याची कॉलर पकडत त्याला सीटवरून उचलले. यानंतर त्याचे कपडे खेचून घेऊन गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत होता ज्यामध्ये कराचीच्या स्टेडियममध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी झालेल्या सर्व देशांचे झेंडे दिसत होते पण भारताचा ध्वज दिसत नव्हता. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना एका सूत्राने सांगितले की, भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये आलेला नाही आणि त्यामुळे भारताचा ध्वज स्टेडियममध्ये लावण्यात आलेला नाही. पाकिस्तानात आलेल्या संघांचे ध्वज लावण्यात आले आहेत. मात्र, या मुद्द्यावरून वाढत चाललेला वाद पाहता नंतर इतर देशांबरोबर पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये भारतीय तिरंगाही लावण्यात आला.
A man arrested and beaten in Lahore stadium for having Indian Flag ?? pic.twitter.com/TBFg8nlHa3
— Riseup Pant (@riseup_pant17) February 24, 2025
अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे चार संघ आहेत. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी त्यांचे सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली आहे, तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ सलग दोन सामने गमावून बाहेर पडले आहेत.