भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याकडे या दोन्ही देशांमधील क्रिकेट चाहत्यांबरोबरच आख्ख्या पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. या सामन्यात भारताचा पराभव व्हावा, अशी अपेक्षा पाकिस्तानमधील चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूंकडूनही व्यक्त होत होती. पण त्याला कारण भारताविषयीचा आकस नसून पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद होतं! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा यजमान देश असूनही पाकिस्तान साखळी फेरीतच बाहेर पडला. त्यात भरीस भर म्हणून आता भारत अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे अंतिम सामनादेखील पाकिस्तानमध्ये होणार नसल्याचं स्पष्ट झालं. यावरून सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल होत आहेत.
भारताचे सर्व सामने दुबईत!
चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे गेल्यापासूनच भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारताचे खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी जाणार नाहीत, असं भारतानं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे मध्यममार्ग म्हणून भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले गेले. यासाठी भारताशी खेळणाऱ्या प्रत्येक संघाला पाकिस्तान ते दुबई आणि मग पुन्हा पाकिस्तान असा वारंवार प्रवास करावा लागला. मंगळवारी ऑस्ट्रेलियाशी झालेल्या सेमीफायनलच्या लढतीत टीम इंडियानं विजय मिळवल्यामुळे थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारताचा सामना म्हणून आता अंतिम सामनादेखील दुबईतच खेळवला जाणार आहे.
पाकिस्तानसाठी दुहेरी नामुष्की!
पाकिस्तानचा संघ साखळी सामन्यातच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे अशा प्रकारे पहिल्याच फेरीत बाहेर पडणारा पहिला देश म्हणून पाकिस्तानच्या नावे नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पण त्यामुळे किमान यजमान म्हणून स्पर्धेचा अंतिम सामना देशात खेळवला जावा, यासाठी पाकिस्तानमधील क्रिकेट चाहते व क्रिकेटपटू अपेक्षा व्यक्त करत होते. पण आता भारताच्या विजयामुळे त्यांच्या या आशा धुळीस मिळाल्या असून आता स्पर्धेचा अंतिम सामनाच यजमान देशातून बाहेर गेल्याची दुहेरी नामुष्की पाकिस्तानवर ओढवली आहे.
पाकिस्तानवर ओढवलेल्या या नामुष्कीमुळे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. एका युजरनं के. एल. राहुलनं मारलेल्या शेवटच्या विजयी षटकाराचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर “एकाच सामन्यात ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान या दोघांचा पराभव करणं ही वेगळीच बाब आहे”, अशी पोस्ट लिहिली आहे.
एका युजरनं पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना होणार नसल्यामुळे दोन मिनिटांचं मौन पाळण्याचं आवाहन लोकांना केलं आहे.
एका युजरनं एका दाक्षिणात्य चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात एक लहान मूल रागाने आणि साश्रूनयनांनी समोर पाहात असल्याचं दिसत आहे. यावर ‘पाकिस्तान यजमान असताना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना दुसऱ्या देशात खेळवला जात असताना पाहणारे पाकिस्तानी नागरिक’, अशी पोस्ट लिहिली आहे.
Pakistanis watching the Champions Trophy final being played in another country, while Pakistan is the host ?#IndvsAus pic.twitter.com/ScfBJ47SLH
— Prayag (@theprayagtiwari) March 4, 2025
एका युजरनं तर ‘ना पाकिस्तान फायनलमध्ये, ना फायनल पाकिस्तानमध्ये’, अशी पोस्ट करत त्यासोबत शोएब अख्तरचा एका टीव्ही शोमधला व्हिडीओ शेअर केला आहे.
पाकिस्तानच्या नामुष्कीजनक कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेटबाबत सर्वांगीण चर्चा व बदलांबाबत मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.