Champions Trophy, IND vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीला बुधवारी (१९ फेब्रुवारी) सुरुवात झाली. आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात नसल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, असे विधान बांगलादेशच्या फलंदाजाने केले आहे. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनला दिलेल्या मुलाखतीमध्येच त्याने हे विधान केले आहे. या मुलाखतीमधील हा भाग सध्या व्हायरल होत आहे. “बुमराह खूप धोकादायक गोलंदाज आहे”, असे बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू मेहदी हसन मिराज म्हणाला होता. यावर मुलाखत घेणाऱ्या बुमराहच्या पत्नीने म्हटले की, तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आलेला नाही. यावर मिराजने म्हटले, “म्हणूनच आम्ही आनंदी आहोत.”
हसन मिराजने केली बुमराहची प्रशंसा
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही आयसीसीची प्रेझेंटर आहे. दुबईत होणाऱ्या भारत वि. बांगलादेश सामन्यापूर्वी तिने दोन्ही संघातील काही खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी मेहदी हसन मिराजने मुलाखतीदरम्यान बुमराहच्या गोलंदाजीची दहशत असल्याचे मान्य केले. बुमराह सर्वांपेक्षा वेगळा गोलंदाज असून तो अतिशय धोकादायक आहे. यावर संजना गणेशनने सांगितले की, हो तो खूप वेगळा आहे, पण यावेळी तो आलेला नाही.
बुमराह नसल्यामुळे आनंदी झालेल्या हसन मिराजने यानंतर संजना गणेशनकडे त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावर संजना गणेशनने म्हटले की, तो आता ठीक आहे. त्याने एनसीएमध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. यानंतर हसन मिराजने म्हटले की, कानपूर कसोटीमध्ये मी त्याच्याकडून दोनवेळा बाद झालो होतो. जगातील सगळेच फलंदाज त्याचा आदर करतात. तो चेंडूला दोन्ही बाजूंनी स्विंग करतो.
दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह संघाबाहेर
जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. यासाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. पण अखेरच्या सामन्यात बुमराहच्या पाठीमध्ये वेदना होत असल्याने तो सामन्याबाहेर पडला. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध झालेल्या तीन वनडे मालिकेसाठीही तो भारतीय संघात नव्हता. बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या या वेगवान गोलंदाजीबरोबर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित राणाला संधी दिली गेली.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या खालच्या भागातील दुखापतीमुळे २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. निवड समितीने बुमराहच्या जागी हर्षित राणाचा संघात समावेश केला आहे. ही दुसरी आयसीसी स्पर्धा असेल ज्यात बुमराह दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. याआधी, पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातूनही बाहेर पडला होता, यादरम्यान त्याला पाठीच्या दुखापतीवर अखेर शस्त्रक्रिया करावी लागली होती.