Who Are Ishan Rajesh And Nilansh Keshwani: पाकिस्तान आणि युएईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघांमध्ये गट फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. यामध्ये भारतावर वर्चस्व गाजवण्यासाठी न्यूझीलंडने खास योजना आखली असून, याचाच एक भाग म्हणून न्यूझीलंडने शनिवारी सराव सत्रात दोन स्थानिक डावखुऱ्या मनगटी फिरकी गोलंदाजांची मदत घेतली होती.
न्यूझीलंडने शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारताच्या कुलदीप यादवचा सामना करण्यासाठी या दोन स्थानिक गोलंदाजांनी फलंदाज टॉम लॅथम आणि अष्टपैलू मायकेल ब्रॅकवेल यांना गोलंदाजी केली. डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप प्रामुख्याने मधल्या षटकांमध्ये गोलंदाजी करतो जिथे लॅथम आणि ब्रॅकवेल अनेकदा फलंदाजी करतात.
“दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील खेळपट्टी थोडीशी संथ आहे आणि निश्चितच या खेळपट्टीवर चेंडूला चांगला स्पिन मिळेल. मला वाटते की, हा सामना मनोरंजक होणार आहे,” असे न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स यांनी येथे सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले. “त्यांच्याकडे (भारताकडे) तीन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी स्ट्राइक रोटेट करणे महत्त्वाचे आहे,” असेही फिलिप्सने पुढे म्हटले.
कोण आहेत इशान आणि निलांश?
न्यूझीलंडच्या फलंदाजांना गोलंदाजी करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या दोन स्थानिक खेळाडूंमध्ये इशान राजेश आणि निलांश केशवानी यांचा समावेश आहे. १५ वर्षीय इशान राजेश हा झेनिथ क्लबचा यूएई अंडर-१६ कॅम्पर आहे आणि निलांश केशवानी, यूएईचा संभाव्य खेळाडू आहे.
विरोधी संघाच्या धावा रोखण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण बळी मिळवण्यासाठी मधल्या षटकांमध्ये कुलदीप हा भारताचा कर्णधार रोहित शर्माचा प्रमुख गोलंदाज आहे.
दरम्यान न्यूझीलंडने शनिवारी दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये सराव सत्र घेतले. परंतु माजी कर्णधार आणि फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ केन विल्यमसन, वेगवान गोलंदाज विल ओ’रोर्क आणि काइल जेमीसन नेट्समध्ये उपस्थित नव्हते.
अव्वल स्थानासाठी स्पर्धा
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट फेरीत रविवारी २ मार्च रोजी दुबईत भारताचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातील हा शेवटचा सामना असेल. हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत पोहोचले असले तरी या सामन्यातील निर्णयावर कोणता संघ पहिला उपांत्य फेरी सामना खेळणार आणि कोणता संघ दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळणार हे ठरणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहेत.