चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाने ३-० असा धुव्वा उडवल्याने स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सलग चार वेळा विजेतेपद मिळविले आहे. पाचव्या विजेतेपदासाठी ते उत्सुक असून घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या जेमी डेवरनं सहाव्याच मिनिटाला पहिला गोल केला. तर पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल करत डेवरनं पहिल्या हाफपर्यंत ऑस्ट्रेलियाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये तिसरा गोल नोंदवत ऑस्ट्रेलियाने भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. भारताचा कर्णधार सरदारा सिंग व मध्यरक्षक मनप्रित सिंग हे दोन्ही अनुभवी खेळाडू या लढतीत दुखापतीसह मैदानात उतरले होते. भारताच्या दृष्टीने ही लढत महत्त्वाची असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंचा सहभाग आवश्यक होता. मात्र, कुठल्याही खेळाडूला विशेष चमक दाखवता आली नाही. चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळण्याची भारताची ही सहावी वेळ आहे.

Story img Loader