पीटीआय, दुबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सर्वात महत्त्वपूर्ण सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ रविवारी एकमेकांसमोेर असणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे लक्ष्य या सामन्यात चमकदार कामगिरी करीत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याचे असेल. तर, मोहम्मद रिझवानच्या पाकिस्तान संघाचा प्रयत्न स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखण्याचा असणार आहे.
भारतीय संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला सहा गडी राखून नमवत चांगली सुरुवात केली, तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभूत व्हावे लागले. या दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स करंडकाचा अखेरचा सामना २०१७ मध्ये अंतिम फेरीत झाला होता. यामध्ये पाकिस्तानने भारताला नमवत करंडक उंचावला होता. रिझवान आणि त्याचे सहकारी लंडनमध्ये मिळवलेल्या या विजयातून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, पाकिस्तान संघाला तिन्ही विभागांत कामगिरी उंचवावी लागणार आहे. भारताने याआधीच परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले आहे. पाकिस्तानचा संघ पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुबईमध्ये दाखल झाला आहे. भारत व पाकिस्तान सामना म्हटला की, खेळाडूंवरही दबाव असतो. दोन्ही संघांमध्ये झालेल्या अखेरच्या पाच एकदिवसीय सामन्यांत भारताने एकही लढत गमावलेली नाही.
कोहली, शमीकडून अपेक्षा
कर्णधार रोहित शर्माची लय ही चिंतेचा विषय होती. मात्र, बांगलादेशविरुद्ध केलेली फलंदाजी पाहता त्याला सूर गवसल्याचे दिसत आहे. त्याने ४१ धावांची खेळी करीत पहिल्या सामन्यात भारताला चांगली सुरुवात दिली. सलामीवीर शुभमन गिल चांगल्या लयीत असून गेल्या सामन्यातील त्याच्या शतकामुळे भारताने २२९ धावांचे लक्ष्य सहजपणे पूर्ण केले. अनुभवी विराट कोहलीकडून संघाला अपेक्षा आहेत. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात त्याला अपयश येत आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध त्याला आणखी एकाग्रतेने खेळावे लागले. भारताची गोलंदाजीही सध्या चांगली दिसत आहे. तंदुरुस्त होऊन संघात परतलेल्या मोहम्मद शमीने गेल्या लढतीत पाच बळी मिळवले. हर्षित राणाची त्याला चांगली साथ मिळत आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या पाकिस्तानविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करतो.कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचे अंतिम अकरातील स्थान जवळपास निश्चित आहे.
रिझवान, बाबरवर मदार
पाकिस्तानसाठी बाबर आझमची लय व खेळण्याचा दृष्टीकोन चिंतेचा विषय आहे. बाबरने न्यूझीलंडविरुद्ध ३२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ९० चेंडूंत ६४ धावा केल्या. धिम्या गतीने धावा केल्याने त्याच्यावर अनेकांनी टीका केली. सलामी फलंदाज फखर झमान जायबंदी झाल्याने पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. झमानच्या जागी इमाम उल हकला संघात स्थान देण्यात आहे. कर्णधार मोहम्मद रिझवानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिरंगी मालिकेत ३५०हून अधिक धावांचा पाठलाग करताना शतक झळकावले होते. भारताविरुद्ध त्याच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. मध्यक्रमात खुशदिल शाहने पहिल्या सामन्यात ६९ धावांची आक्रमक खेळी केली होती. पाकिस्तानची गोलंदाजी ही नेहमीच प्रतिस्पर्धी संघांसाठी अडचणीची राहिली आहे. मात्र, गेल्या सामन्यात त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात शाहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, हारिस रौफ यांना कामगिरी उंचवावी लागेल.
संघ
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा , बाबर आझम, इमाम उल हक, कामरान गुलाम, सौद शकील, तैयब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
दुबईच्या मैदानावर दव नसल्याने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघावर अधिक दबाव असणार असून ३००हून अधिकची धावसंख्या ही चांगली राहील. आम्ही सकारात्मक व आक्रमक क्रिकेट खेळ करण्याचा प्रयत्न करु. सामन्यातील मधल्या षटकांमध्ये (२१ ते ४० षटके) फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवण्याची चांगली संधी असेल. नाणेफेकीला फारसा परिणाम दिसणार नाही.– शुभमन गिल,भारताचा उपकर्णधार
●वेळ : दुपारी २.३० वा.
●थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.