लाहोर : आपापल्या सलामीच्या सामन्यांत पराभव पत्करणारे इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज, बुधवारी आमनेसामने येणार आहेत. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा ठरणार आहे.

सलामीच्या सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलिया, तर अफगाणिस्तानला दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करावी लागली होती. त्यामुळे हे दोनही संघ ‘ब’ गटात सध्या पिछाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५० हून अधिक धावा रोखण्यातही इंग्लंड संघ अपयशी ठरला. आता इंग्लंडच्या गोलंदाजांना कामगिरीत सुधारणा करावी लागेल.

अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर कायमच आव्हान उपस्थित केले आहे. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडवर मातही केली होती. या कामगिरीतून प्रेरणा घेण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न असेल.

बटलर, डकेटवर नजर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेटने १६५ धावांची विक्रमी खेळी केली होती. चॅम्पियन्स करंडकातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याला जो रूटची साथ लाभली. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंना चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरमध्ये आहे. मधल्या षटकांत बटलरची भूमिका निर्णायक ठरू शकेल. फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

फिरकी त्रिकुटावर भिस्त

इंग्लंडचे फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध अडखळताना दिसतात. चॅम्पियन्स करंडकापूर्वीच्या एकदिवसीय मालिकेत भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजांना सतावले होते. आता अशीच कामगिरी करण्याचा रशीद खान, नूर अहमद आणि मोहम्मद नबी या अफगाणिस्तानच्या फिरकी त्रिकुटाचा प्रयत्न असेल. अफगाणिस्तानच्या फलंदाजीची मदार रहमानुल्ला गुरबाझ, रहमत शाह यांच्यावर असेल.

● वेळ : दुपारी २.३० वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्पोर्ट्स १८-१, जिओहॉटस्टार अॅप.

Story img Loader