पीटीआय, कराची

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १६ फेब्रुवारी रोजी लाहोरला आयोजित करण्याचा पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) निर्णय घेतला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) याला संमती दिल्याची माहिती आहे.

चॅम्पियन्स करंडकातील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात १९ फेब्रुवारीला कराची येथील नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र, त्याच्या तीन दिवस आधीच उद्घाटन सोहळा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. ‘पीसीबी’चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी चॅम्पियन्स करंडकाच्या संपूर्ण कार्यक्रमाला मंजुरी दिल्याचे समजते आहे.

पाकिस्तानातील स्टेडियमच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. लाहोर येथील गद्दाफी स्टेडियम ७ फेब्रुवारी रोजी अधिकृतरीत्या खुले केले जाणार आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर ११ फेब्रुवारीला कराचीच्या नॅशनल स्टेडियमचे नव्याने उद्घाटन केले जाईल. या कार्यक्रमाला राष्ट्रपती आसिफ अली झरदारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

चॅम्पियन्स करंडकात सहभागी होणाऱ्या सर्व आठ संघांच्या कर्णधारांचे एकत्रित छायाचित्र आणि पत्रकार परिषदेची तारीख ठरविताना ‘पीसीबी’ व ‘आयसीसी’ यांची बरीच ओढाताण झाली. अखेर त्यांनी १६ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली असून उद्घाटन सोहळा लाहोरमध्ये आयोजित करण्याचा त्यांचा मानस असल्याचे समजते. हा सोहळा ऐतिहासिक लाहोर किल्ल्यावरील हुजुरी बाग येथे होणार असून विविध क्रिकेट मंडळांचे अधिकारी, सिनेअभिनेते, दिग्गज खेळाडू आणि सरकारी अधिकारी यांना आमंत्रित केले जाईल. या सोहळ्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माला लाहोरला जाणार का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Champions trophy opening ceremony to be held in lahore sports news amy