Champions Trophy 2025 Semifinal Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४९ धावा केल्या, त्यानंतर वरुण चक्रवर्तीने पाच विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर आळा घातला. त्याला कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ २०५ धावांत गारद झाला. यासह भारतीय संघ अ गटात टेबल टॉपर ठरला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि आतापर्यंत टीम इंडिया सध्याच्या स्पर्धेत अपराजित आहे. भारताने गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेटने पराभव केला होता. आता न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला आहे.
४ मार्च रोजी दुबईच्या मैदानावर टीम इंडियाची उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी लाहोरच्या मैदानावर होणार आहे. दुसरा उपांत्य सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ उपांत्य फेरीचे संपूर्ण वेळापत्रक:
४ मार्च पहिली उपांत्य फेरी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुबई – दुपारी २.३० वाजता
५ मार्च दुसरा उपांत्य सामना – दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, लाहोर – दुपारी २.३० वाजता
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाची टॉप फलंदाजी ऑर्डर फेल ठरली आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय संघ ३० धावांत ३ विकेट गमावून अडचणीत सापडला होता. आपला ३०० वा वनडे सामना खेळत असलेला विराट कोहलीदेखील ग्लेन फिलिप्सच्या एका उत्कृष्ट कॅचवर झेलबाद झाला. मात्र त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी संघाचा डाव सावरला. अय्यरने ७९ धावांची खेळी केली. अक्षर पटेलने ४२ आणि हार्दिक पंड्याने ४५ धावा केल्या. या खेळाडूंमुळेच भारतीय संघाला २४९ धावांपर्यंत मजल मारता आली.
यानंतर भारताच्या फिरकी विभागाने न्यूझीलंडचा समाचार घेत त्यांच्या धावांवर इतका मोठा ब्रेक लावला की त्यांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. वरुण चक्रवर्तीने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने १० षटकांत ४२ धावा देत ५ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली.