Champions Trophy Semi Final Scenario of Group B: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी झालेल्या आठ संघांची दोन गटात विभागणी केली आहे. यापैकी अ गटातील चित्र स्पष्ट झाले आहे. अ गटातून भारत आणि न्यूझीलंडचे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पण दुसऱ्या ब गटातील उपांत्य फेरीचे चित्र अधिकचं जटिल झाले आहे. आता भारताविरूद्ध कोणता संघ उपांत्य फेरीचा सामना खेळणार हे निश्चित होण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे.
अ गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. भारत आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीसाठी आपले स्थान पक्के केले आहे. दोन्ही संघांनी आपापले सुरूवातीचे दोन सामने जिंकले आहेत. मात्र, उपांत्य फेरीपूर्वी भारत आणि न्यूझीलंडचे संघ साखळी सामन्यात आमनेसामने येणार आहेत. या सामन्याचे महत्त्व एवढेच आहे की, या सामन्यातून ‘अ’ गटातील उपांत्य फेरीसाठी पहिला कोणता संघ पात्र ठरणार आहे हे कळेल.
तर ब गटात अफगाणिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहेत. त्यापैकी इंग्लंडचा संघ सुरूवातीचे दोन्ही सामने गमावत या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर आता दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे संघ शर्यतीत आहे. दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक सामना पावासमुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांचे आता तीन तीन गुण आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी तीन गुण आहेत, तर अफगाणिस्तानचे एक सामना जिंकून दोन गुण आहेत. आता या गटातून उपांत्य फेरीची समीकरणे काय आहेत हे समजून घेऊया. अफगाणिस्तानचा शेवटचा साखळी सामना शुक्रवारी लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवला जाईल. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ आपला शेवटचा साखळी सामना शनिवारी इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे, हा सामना कराचीमध्ये होणार आहे.
ब गटातील उपांत्य फेरीची समीकरण
जर ऑस्ट्रेलियन संघाने अफगाणिस्तानला पराभूत केले तर उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित होईल, कारण त्याचे ५ गुण होतील. मात्र अफगाणिस्तान संघाने हा सामना जिंकल्यास त्यांचे चार गुण होतील. म्हणजे अफगाणिस्तानचा संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचेल.
आता जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, जर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकला तर ते थट उपांत्य फेरीत जातील आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडेल. पण जर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकला तर नेट रनरेटच्या आधारे सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या संघाचा निर्णय होईल.
आता उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणत्या संघाशी होऊ शकतो? अ गटातील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना त्या गटातील उपांत्य फेरीसाठी जाणारा अव्वल संघ कोणता हे ठरवेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतरच भारताचा सामना कोणत्या संघाशी होणार हे निश्चित होईल. जो २ मार्चला दुबईत खेळवला जाणार आहे. भारतासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानमधील कोणताही संघ येऊ शकतो. त्याचे चित्र आगामी सामन्यांनंतरच ठरेल.