ICC Champions Trophy To Be Held on Neutral Venue: आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बाबत मोठे अपडेट दिले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने कुठे खेळवले जाणार, यावरून जोरदार चर्चा सुरू होती. यावर आयसीसी काय भूमिका घेते याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. आता आयसीसीने यावर अधिकृत घोषणा केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. ज्यासाठी भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊन सामने खेळण्यास नकार दिला होता. पण आता दोन्ही क्रिकेट बोर्डांनी हायब्रिड मॉडेलवर सहमती दर्शविली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अधिकृत घोषणा केली आहे. ICC च्या मते, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तानमध्ये आणि तटस्थ ठिकाणी खेळवली जाईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. मात्र, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने कोणत्या देशात आणि कोणत्या ठिकाणी खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे परंतु ठिकाणांच्या अनिश्चिततेमुळे स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून, त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.
तटस्थ ठिकाणी होणार भारत-पाकिस्तान सामने
ICC बोर्डाने गुरुवारी १९ डिसेंबर रोजी सांगितले की २०२४-२०२७ च्या सायकल दरम्यान कोणत्याही देशाने आयोजित केलेल्या ICC कार्यक्रमांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. हा नियम आता आगामी आयसीसी पुरूष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (पाकिस्तान आयोजित) साठी लागू होईल. जी फेब्रुवारी ते मार्च २०२५ दरम्यान खेळवली जाईल आणि ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ (भारताद्वारे आयोजित) आणि ICC पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ (भारत आणि श्रीलंकेद्वारे आयोजित) यांना देखील लागू होईल. याचबरोबर २०२८ च्या महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपदही पाकिस्तानकडे देण्यात आले आहे.
आयसीसीच्या अधिकृत घोषणेसह, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद संपुष्टात आला असून आता चाहत्यांना स्पर्धेच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा आहे.