Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुडघे टेकावे लागले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद मिळण्याची आशा सध्या पीसीबीसाठी धूसर वाटतं आहे. या आठ संघांच्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने पीसीबी असहाय्य दिसत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी संपर्क साधला, परंतु कोणतीही मदत होऊ शकली नाही. पण आता एका देशाने पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाठिंबा दिल्याची चर्चा आहे, तो कोण आहे? जाणून घेऊया.
पीसीबीला मिळाला ईसीबीचा पाठिंबा –
पीसीबीचे प्रमुख मोहसिन नक्वी आणि सीईओ सलमान नसीर यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ बद्दल बोलण्यासाठी लंडनमध्ये इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांची भेट घेतली. पीसीबीच्या म्हणण्यानुसार, या बैठकीत त्यांना ईसीबीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी थॉम्पसन यांच्या विधानाचाही हवाला दिला ज्यामध्ये ते म्हणाले, ‘इंग्लंडचा अलीकडील पाकिस्तान दौरा खूपच प्रभावी होता. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला आमच्या शुभेच्छा आहेत.’
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी टूरमध्ये केला बदल –
बीसीसीआयने आक्षेप घेतल्यानंतर आयसीसीने शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पीसीबीच्या ‘ट्रॉफी टूर’मध्ये बदल केला. त्यामुळे ट्रॉफी पाकव्याप्त शहरातून जाणार नाही. बीसीसीआय किंवा आयसीसीकडून काहीही सकारात्मक न मिळाल्याने पीसीबीने आता इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजनासाठी पीसीबी तयारः मोहसीन नक्वी
पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी आपल्या इंग्लंडच्या समकक्षाला आश्वासन दिले की सर्वकाही सुरळीत होईल. त्यांची आयोजनाची ठिकाणे लवकर तयार होतील. तसेच सुरक्षा कडेकोट असेल आणि पाहुण्या संघांना अनुदान मिळेल. नक्वी थॉम्पसनला म्हणाले, ‘पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपदासाठी सज्ज आहे. स्टेडियम्सचे अपग्रेडेशन केले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रत्येक स्तरावर ठोस व्यवस्था करण्यात येत आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्या संघांना ‘स्टेट गेस्ट प्रोटोकॉल’ दिला जाईल.