पीटीआय, दुबई

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठल्यानंतरही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजयी संघात बदल करण्याचा मोह होऊ शकतो, पण भारतीय संघ व्यवस्थापन हा प्रयोग करेल की नाही याबाबत खात्री देता येत नाही, असे मत यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलने व्यक्त केले.

‘‘भारतीय संघाची सध्याची स्थिती भक्कम आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध नव्या खेळाडूंना संधी देण्याचा मोह होऊ शकतो. पण, चॅम्पियन्स स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धेत हा मोह टाळला जाईल की नाही हे मला माहित नाही, कारण मी संघ व्यवस्थापनाचा भाग नाही,’’ असे राहुल म्हणाला.

न्यूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही. अर्थात, ही स्पर्धा इतकी मोठी आहे की कुठल्याच संघाला कमी लेखून चालत नाही. ‘आयसीसी’ स्पर्धेत न्यूझीलंडने कायमच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याशी खेळणे नेहमीच आव्हानात्मक असते असेही राहुलने सांगितले.

संघ व्यवस्थापनाने यष्टिरक्षक म्हणून जरी पसंती दिली असली, तरी पंत आपली जागा घेईल अशी भिती वाटते का असे विचारल्यावर राहुलने भिती वाटण्याचा प्रश्नच येत नाही. ‘‘मुळात माझी त्याच्याशी स्पर्धा नाही. मी त्याच्यासारखा खेळही करायला जात नाही. कुठल्याही क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली, तर मी माझ्यासारखाच खेळ करतो. माझ्याबद्दल कोण काय म्हणतो याकडे मी लक्ष देत नाही,’’ असेही राहुल म्हणाला.

Story img Loader