देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी एक असलेले चंद्रकांत पंडित आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) काम करताना दिसणार आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाने (केकेआर) पंडित यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आयपीएलच्या १५व्या हंगामानंतर प्रशिक्षकपद सोडले होते. दरम्यान, केकेआरचा सहमालक असलेल्या शाहरुख खानच्या मुलाने आपल्या संघाच्या नवनियुक्त प्रशिक्षकाचे स्वागत केले आहे.
आर्यन खानने केकेआरचे नवीन मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वागत केले आहे. “स्वागत आहे सर, आगामी हंगामापासून तुमच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. कोरबो लोर्बो जीतबो,” अशी इन्स्टाग्राम स्टोरी आर्यनने शेअर केली होती. आर्यन खान सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, त्यामुळे त्याने चंद्रकांत पंडित यांच्यासाठी केलेली पोस्ट फार खास समजली जात आहे.
दरम्यान, मराठमोळ्या चंद्रकांत पंडित यांनी मध्य प्रदेशला यावर्षीचे (२०२२) रणजी विजेते बनवले आहे. तेव्हापासून त्यांची क्रिकेट विश्वात जोरादर चर्चा आहे. पंडित यांनी सचिन तेंडुलकरचे गुरू आणि प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटमधील बारकावे शिकून घेतलेले आहेत. एक खेळाडू म्हणून पंडित यांनी भारतीय संघासाठी पाच कसोटी आणि ३६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ते १९८६ विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा भाग होते.
चंद्रकांत पंडित यांच्या देशांतर्गत कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईकडू त्यांनी१३८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी ४८.५७ च्या सरासरीने ८ हजार २०९ धावा केलेल्या आहेत. पंडित यांना आतापर्यंत ज्या संघांना प्रशिक्षण दिले आहे, त्या संघांनी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या आयपीएल हंगामात केकेआर काय कमाल दाखवणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.