आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताच्या बॉक्सिंग क्षेत्रातील मतभेद दूर होण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने नियुक्त केलेल्या अस्थायी समितीच्या प्रयत्नांना बॉक्सिंग इंडियाकडून थंड प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे बॉक्सिंगमधील सावळागोंधळ अद्यापही कायम आहे.
राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यासाठी अस्थायी समितीने ४ सप्टेंबर रोजी सर्व राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. मात्र बॉक्सिंग इंडियाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बॉक्सिंग इंडियाला तात्पुरती मान्यता दिली आहे. बॉक्सिंग इंडियाने ११ सप्टेंबर रोजी नवीन कार्यकारिणीसाठी निवडणुका घेण्याचे ठरवले असून त्यासाठी ६ सप्टेंबरपूर्वी अर्ज पाठविण्याची मुदत आहे. अस्थायी समितीने ४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेली सभा म्हणजे आमच्या निवडणूक कार्यक्रमांत विघ्ने आणण्याचा प्रयत्न आहे असे बॉक्सिंग इंडियाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
बॉक्सिंग इंडियास अनेक राज्य संघटनांकडूनच विरोध दर्शविला जात आहे. त्यांना निवडणुका घेण्याचा अधिकारच नाही असे मत अनेक संघटनांनी व्यक्त केले आहे. मात्र बॉक्सिंग इंडियाने या वृत्ताचा इन्कार केला आहे. बॉक्सिंग इंडियाच्या अध्यक्षपदासाठी संदीप जाजोदिया व पी. भास्करन यांचे अर्ज आले आहेत. खजिनदारपदासाठी खोईबी सालम व हेमंतकुमार कालिता यांनी अर्ज भरले आहेत. सरचिटणीसपदासाठी रोहित जैन (दिल्ली), जय कवळी (महाराष्ट्र) व राकेश ठाकरन (हरयाणा) यांनी अर्ज पाठविले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा