उस्मानाबादच्या छत्रपती स्पोर्ट्स क्लबने आर्यन स्पोर्ट्सवर ८-७ असा निसटता विजय मिळवित अखिल भारतीय खो-खो स्पर्धेतील महिलांच्या सुपर लीगमध्ये आगेकूच राखली.

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत छत्रपती व आर्यन स्पोर्ट्स क्लबबरोबरच नाईक स्पोर्ट्स क्लब व शिवभक्त विद्यालय या दोन्ही ठाण्याच्याच संघांनी पहिल्या चार क्रमांकांसाठी असलेल्या सुपर लीगमध्ये स्थान मिळविले. पाच ते आठ क्रमांकांसाठी असलेल्या सुपर लीगमध्ये साखरवाडी क्रीडा मंडळ (सातारा), केरळ स्पोर्ट्स क्लब (केरळ), भागाबती क्लब (बंगाल) व कावेरी कपिला स्पोर्ट्स क्लब (बंगळुरू) या संघांना स्थान मिळाले. पुरुष विभागात पहिल्या चार क्रमांकांसाठी नवमहाराष्ट्र संघ (पुणे), महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी (मुंबई उपनगर), हिंदकेसरी संघ (कवठेपिरान, सांगली), जयहिंद क्रीडा मंडळ (कोल्हापूर) यांनी सुपर लीगमध्ये स्थान मिळविले. पाच ते आठ क्रमांकांसाठी बजरंग बली स्पोर्ट्स (कर्नाटक), विहंग क्लब (ठाणे), राणाप्रताप क्रीडा संघ (कुपवाड, सांगली), श्री समर्थ व्यायाम मंदिर (मुंबई) यांना सुपर लीगमध्ये प्रवेश मिळाला.
सुपर लीगमधील छत्रपती स्पोर्ट्स व आर्यन संघ हा सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला. पूर्वार्धात दोन्ही संघांमध्ये ४-४ अशी बरोबरी होती. छत्रपती संघाकडून सारिका काळे (३ मि.४० सेकंद, अडीच मिनिटे व २ गडी) व सुप्रिया गाडवे ( दीड मिनिटे व ३ मि.१० सेकंद तसेच दोन गडी) या राष्ट्रीय खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी केली. निकिता पवार हिने दीड मिनिटे व २ मि.२० सेकंद संरक्षण करीत त्यांना चांगली साथ दिली. आर्यन संघाकडून ऐश्वर्या सावंत (२ मि.५० सेकंद व २ मि.२० सेकंद), आरती कांबळे (२ मिनिटे व २ मि.२० सेकंद), अपेक्षा सुतार (२ मि.१० सेकंद व २ मि.२० सेकंद तसेच २ गडी) यांची लढत अपुरी ठरली.
सुपरलीगमधील अन्य लढतीत साखरवाडी संघाने भागाबती क्लबचा १२-११ असा पराभव केला. पूर्वार्धात ५-६ अशा एका गुणाने पिछाडीवर असलेल्या साखरवाडी संघाने उत्तरार्धात वेगवान खेळ करीत विजयश्री खेचून आणली. त्याचे श्रेय पल्लवी लिंबाडे (२ मि.४० सेकंद व २ मि.२० सेकंद व २ गडी), प्रियंका येळे (१ मि.१० सेकंद व २ मि.२० सेकंद तसेच तीन गडी) यांच्या खेळास द्यावे लागेल. भागाबती संघाकडून दीपिका चौधरी (३ मि.२० सेकंद व २ मि.५० सेकंद तसेच ३ गडी), धर्माली साही (२ मि.१० सेकंद व १ मि.१० सेकंद) यांची लढत निष्फळ ठरली.
इंटरनेटवरही प्रक्षेपण
क्रिकेट व फुटबॉलप्रमाणेच खो-खो या खेळाचेही इंटरनेटवर थेट प्रक्षेपण करण्याची सुविधा या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. नवमहाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी ही सुविधा तयार केली आहे. http://www.gamegoeson.com/khokho/live किंवा
http:khokhonms.in या बेवसाईटवर हे प्रक्षेपण पाहण्याची संधी देण्यात आली आहे.
दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण
या स्पर्धेचे दूरदर्शनच्या क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. शनिवारी सकाळी ७.३० ते १० व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हे प्रक्षेपण केले जाणार आहे.

Story img Loader