ब्रानिस्लाव्ह इव्हानोव्हिच याने दुखापतग्रस्त वेळेत हेडरद्वारे केलेल्या जोरावर चेल्सीने बेनफिका संघाचा अंतिम फेरीत २-१ असा पराभव करून युरोपा लीग जेतेपदावर नाव कोरले. चेल्सीचे हे दुसरे युरोपियन जेतेपद ठरले. चेल्सीला इडेन हजार्ड आणि जॉन टेरी या दोन अव्वल खेळाडूंची अनुपस्थिती जाणवली. कामगिरीत सातत्याचा अभाव असणाऱ्या फर्नाडो टोरेसने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत ६०व्या मिनिटाला चेल्सीला आघाडी मिळवून दिली. बेनफिकाच्या गोलक्षेत्रात चेंडूवर नियंत्रण मिळवल्यानंतर टोरेसने इझेक्वाएल गॅरे आणि कर्णधार लुईसाओ यांना चकवून पहिला गोल केला. पण त्यांना हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. बेनफिकाच्या ऑस्कर काडरेझोने आठ मिनिटांनंतर गोल करून चेल्सीच्या आनंदावर विरजण आणले. अखेर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना जुआन माटाने दिलेल्या कॉर्नरवरून सर्बियाच्या इव्हानोव्हिचने बेनफिकाचा गोलरक्षक आर्थर याला चकवून ९३व्या मिनिटाला चेल्सीच्या विजयावर मोहोर उमटवली.

Story img Loader