बंडय़ा मारुती मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या हीरकमहोत्सवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात चेंबूर क्रीडा केंद्र आणि मुंबई पोलीस अंतिम फेरीत आमनेसामने असणार आहेत.
उपांत्य फेरीच्या सामन्यात चेंबूर क्रीडा केंद्राने शिवशक्तीला ९-८ असे नमवले. मध्यंतराला ९-८ अशी आघाडी घेणाऱ्या चेंबूरने उत्तरार्धात एकही गुण घेतला नाही आणि शिवशक्तीलाही गुण घेऊ दिला नाही. अश्विनी शेवाळे, राजश्री पवार यांनी सुरेख खेळ केला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत मुंबई पोलीस जिमखान्याने डॉ.शिरोडकरचे आव्हान ३०-२८ असे मोडून काढले. शीतल बावडेकर, सोनाली धुमाळ यांचे भक्कम क्षेत्ररक्षण आणि कल्याणी विचारे आणि शीतल शिंदे यांच्या चतुरस्त्र चढायांच्या जोरावर मुंबई पोलीसने हा विजय मिळवला.
पुरुषांच्या गटात उत्कर्षने जय भारतचा २७-११ असा पाडाव केला. विजय नवनाथ संघाने उपनगरच्या अंबिका संघाचा २२-७ असा धुव्वा उडवला. संजय राणे विजय नवनाथच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कल्याणच्या ओम कबड्डी संघाने चुरशीच्या लढतीत ओमशंकरला १९-१४ असे नमवले. प्रशांत चव्हाण, गणेश बोडके आणि किरण मोपे यांनी सुरेख खेळ केला. विजय क्लब आणि शाहू सडोली यांच्या दरम्यानच्या सामन्यात शाहू सडोली संघाला बेशिस्त वर्तनामुळे स्पर्धेतून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा