भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत आपल्या अभियानाची विजयी सलामी दिली. दरम्यान दमदार पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांना सलामीच्या लढतीतच गाशा गुंडाळावा लागला.
नव्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या रावफेन लासेनसह खेळणाऱ्या पेसने ऑस्ट्रियाच्या हैदर मौरूर आणि स्लोव्हाकियाच्या एल. लॅको जोडीवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. पेसने विजयी आगेकूच केल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्याला त्याचा जुना साथीदार महेश भूपतीचा सामना करावा लागू शकतो. पेसच्या कारकीर्दीचे हे २०वे वर्ष असून, यंदाच्या हंगामातले पहिले जेतेपद पटकावण्यासाठी तो उत्सुक आहे.
एकेरी प्रकारात तैपेईच्या येन स्युन ल्युने सोमदेववर ६-३, ६-४ अशी मात केली. वाइल्ड कार्डद्वारे सोमदेवला प्रवेश देण्यात आला होता. मात्र घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या पाठिंब्यातही सोमदेवला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.
तात्सुमा इटोने भारताच्या युवा रामकुमार रामनाथनला ६-३, ६-३ असे नमवले. टाळता येण्यासारख्या भरपूर चुकांचा फटका रामनाथनला बसला. अन्य लढतीत चेक प्रजासत्ताकच्या जिरी वेस्लेने विजय प्रशांतचा ६-२, ६-१ असा धुव्वा उडवला.