मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा तसेच आयपीएल ही स्पर्धा अगदी सुरुवातीपासून गाजवणारा अनुभवी खेळाडू म्हणजे सुरेश रैना. मात्र याच सुरेश रैनाला १५ व्या पर्वाआधी झालेल्या महालिलावामध्ये कोणत्याही संघाने विकत घेतलं नाही. रैना अनसोल्ड राहिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्ती केली. चेन्नई सुपर किंग्सकडून मागील अनेक वर्षांपासून खेळणाऱ्या रैनाला लिलावामध्ये कोणत्याही संघाने विकत घेण्यात रस दाखवला नाही.
चेन्नईने तरी रैनासाठी बोली लावायला हवी होती असं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलंय. अनेकांनी तर सीएसकेने रैनाला चुकीची वागणूक दिल्याचाही आरोप केलाय. मात्र आता रैनाला चेन्नईने विकत का घेतलं नाही याचा खुलासा चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या काशी विश्वनाथन यांनी केलाय.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत समावेश असणाऱ्या रैनाने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०५ सामने खेळले आहेत. यात त्याने एक शतक आणि ३९ अर्थशतकं साजरी केलीयत. एकूण ५ हजार ५२८ धावा त्याने केल्यात. तसेच तो गुजरात लायन्स संघाचा कर्णधारही राहिलाय. २०२० मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याने लीग न खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्यासाठी मागील पर्व काही खास राहिलं नाही. त्याने १२ सामन्यांमध्ये एक अर्धशतक करत एकूण १६० धावा केल्या.
नक्की पाहा >> Photos: ‘टेनिस बॉल क्रिकेटचा सुपरस्टार’ अगदी शेवटच्या क्षणी आर्यन, सुहानामुळे KKR च्या संघात; पण तो आहे तरी कोण?
मात्र यंदाच्या पर्वामध्ये रैना खेळताना दिसणार की नाही याबद्दलचा संभ्रम कायम आहे. लिलावामध्ये तरी रैनावर कोणीच बोली लावलेली नाही. याचसंदर्भात स्पष्टीकरण देणारा एक व्हिडीओ सीएसकेकडून जारी करण्यात आलाय. युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सीएसकेचे सीईओ काशी यांनी रैनाला विकत न घेण्यामागील कारणाचा खुलासा केलाय. “रैना १२ वर्षांपासून सीएसकेसाठी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. रैनाला विकत न घेण्याचा निर्णय आमच्यासाठी फार कठीण होता. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की संघाची रचना आणि कामगिरी त्या संघातील खेळाडूंवर अवलंबून असते,” असं काशी यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> IPL 2022 Auction: “माझ्यासाठी १३ कोटींची बोली लावल्यानंतर लिलाव थांबावा असं वाटतं होतं, कारण…”
“एकंदरित कामगिरी आणि संघाची रचना या दोन मुख्य गोष्टी कारण आहेत. या दोन गोष्टींचा विचार करता आम्हाला तो (रैना) या संघात योग्य ठरणार नाही असं वाटलं. म्हणूनच आम्ही त्याला विकत घेतलं नाही,” अशी माहिती काशी यांनी दिली. काशी यांनी चेन्नईच्या संघाला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ ड्यूप्लेसीची कमतरताही जाणवेल असं म्हटलंय. फाफ २०११ पासून चेन्नईसाठी खेळत होता. मागील वर्षी चषकत जिंकण्यात त्याचा मोठा वाटा होता. आता फाफ रॉलय चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार आहे.