पुणे : गेल्या काही वर्षांत भारताने बुद्धिबळ क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा राखायला सुरुवात केली. आशियाई सांघिक विजेतेपद, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक, जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्य आणि कांस्यपदके आणि आता बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष व महिला संघांचे सुवर्णपदकही भारताच्या नावावर लागल्यावर आजपर्यंतचा दबदबा वर्चस्वात रूपांतरित झाला आणि बुद्धिबळ महासत्ता अशी नवी ओळख भारताला मिळाली. यानंतर आता जबाबदारी वाढली असून, इथेच न थांबता अशीच तुल्यबळ खेळाडूंची दुसरी फळी निर्माण करण्याचे काम सुरू ठेवणार असल्याचे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील दुहेरी सुवर्ण यशात प्रशिक्षक म्हणून अभिजित यांचा वाटा मोठा होता. महिला संघाचा प्रशिक्षक या नात्याने अभिजितने भारतीय महिला संघाचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विजेतेपदापर्यंत नेले. या यशानंतर व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून अभिजितशी संवाद साधला तेव्हा खेळाडू अभिजित आता प्रशिक्षक म्हणून रुळल्याचे जाणवले.

हेही वाचा >>> दुलीप करंडक स्पर्धा पुन्हा विभागीय पातळीवर?

दुहेरी सुवर्णयशाबद्दल…

भारतासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे. गेल्या काही वर्षांतील दबदब्याचे आता वर्चस्वात रूपांतर झाले आहे. ऑलिम्पियाडचे यश हे महासत्ता ठरल्याचेच प्रतीक आहे. प्रत्येक खेळाडू कमालीच्या जिद्दीने खेळला.

महिला संघाची प्रगती

चार वर्षांपूर्वी महिला संघांची जबाबदारी घेतली. तेव्हा महिलांना एकही पदक नव्हते. मात्र, मी जबाबदारी स्वीकारल्यापासून सांघिक रौप्य, ऑलिम्पियाड स्पर्धेत गेल्या वर्षी कांस्य, आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य आणि आता ऑलिम्पियाड सुवर्णपदक महिला संघाच्या नावावर कोरले गेले आहे. आपणही पदक जिंकू शकतो हा आत्मविश्वास महिला खेळाडूंमध्ये निर्माण करू शकलो याचा मला अधिक आनंद आहे. पदकापासून वंचित राहिलेल्या मुली आता कांस्यपदक मिळाल्यावरही अपयश मानतात हे प्रगतीचे उत्तम उदाहरण असल्याचे कुंटेंनी नमूद केले.

ऑलिम्पियाडचे नियोजन

कोनेरु हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका या प्रमुख खेळाडू होत्या. या दोघी खेळल्या असत्या तर ठळकपणे वर्चस्व राखता आले असते. तरी द्रोणावल्लीला आव्हान खूप होते. पण, अनुभवाच्या जोरावर तिने खूप सरस कामगिरी केली. विशेष म्हणजे तिसऱ्या पटावार दिव्या देशमुखकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्या तिने पूर्ण केल्या. प्रतिस्पर्धी संघांचा अभ्यास करताना तिसऱ्या पटावर तेवढ्या तगड्या प्रतिस्पर्धी नव्हत्या. तेव्हा दिव्या अशा वेळी मोठे यश मिळविणार याची खात्री होती. त्यामुळेच तिला तिसऱ्या पटावरच खेळवले, असे कुंटे म्हणाले.

प्रशिक्षक बनण्याविषयी…

२०१९ मध्येच खेळणे बंद केले. त्यानंतर खेळाडूंना घडविण्याकडे लक्ष देऊ लागलो. याच दरम्यान महिला संघांचा प्रशिक्षक बनण्याची संधी चालून आली. यात यशस्वी ठरलो. आपणही जिंकू शकतो असा आत्मविश्वास मुलींमध्ये निर्माण केला. खेळाडू म्हणून ऑलिम्पियाडच्या विजेतेपदाचा मान मिळाला नाही, तो प्रशिक्षक म्हणून मिळाला. खूप आनंदी आहे. आता हे वर्चस्व कायम टिकविण्यासाठी कुमार गटापासूनच तगड्या खेळाडूंची दुसरी फळी निर्माण करण्यासाठी आणि भारतात जास्तीत जास्त मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे कुंटे म्हणाले.

भारताचे भविष्य सुरक्षित…

द्रोणावल्ली आणि विदित हेच काय ते वयाने मोठे खेळाडू या संघात होते. गुकेश, अर्जुन, वंतिका, दिव्या, वैशाली, प्रज्ञानंद हे एकाच वयोगटातील खेळाडू आहेत. लहानपणापासून ते एकत्र खेळत आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकप्रकारे नाते तयार झाले आहे आणि त्याचा त्यांना फायदा होतो. भविष्यात हे खेळाडू नक्कीच अधिक चांगले यश मिळवतील. जागतिक लढतीत गुकेशचे पारडे जड आहेच. तो चांगला खेळत आहे. यापुढे जागतिक विजेतेपदाची लढत दोन भारतीयांमध्ये होईल अशी आशा निर्माण झाली आहे, असे कुंटेंनी सांगितले.

खेळाडू म्हणून ऑलिम्पियाडच्या विजेतेपदाचा मान मिळाला नाही, तो प्रशिक्षक म्हणून मिळाला. खूप आनंदी आहे. आता हे वर्चस्व कायम टिकविण्यासाठी कुमार गटापासूनच तगड्या खेळाडूंची दुसरी फळी निर्माण करण्यासाठी आणि भारतात जास्तीत जास्त मोठ्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – अभिजित कुंटे , महिला संघाचे प्रशिक्षक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview for loksatta zws