वृत्तसंस्था, नवी दिल्ली
प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यासाठी मला २० वर्षे वाट पाहावी लागली. अखेर ही प्रतीक्षा संपल्याचा खूप आनंद आहे, पण मी माझ्या वैयक्तिक कामगिरीने समाधानी नाही, अशी भावना भारताची अनुभवी बुद्धिबळपटू द्रोणावल्ली हरिकाने व्यक्त केली.

भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी रविवारी इतिहास घडवताना बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रथमच सुवर्णयश संपादन केले. बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या या स्पर्धेत अखेरच्या फेरीत विजय मिळवण्यासाठी दडपण असताना दोन्ही संघांनी संयम राखून खेळ केला. पुरुष संघाने स्लोव्हेनिया, तर महिला संघाने अझरबैजानला ३.५-०.५ अशा समान फरकाने पराभूत करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

हेही वाचा >>>IND vs BAN: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात दोन मोठे बदल, कानपूरच्या खेळाडूचे होणार पुनरागमन, वाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

महिला संघासाठी ३३ वर्षीय हरिकाने तांत्रिकदृष्ट्या आपला सर्वोत्तम खेळ करताना पहिल्या पटावर विजय मिळवला. तसेच १८ वर्षीय दिव्या देशमुखने तिसऱ्या पटावर गौहर बेदुल्लायेवाचा पराभव करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करतानाच वैयक्तिक सुवर्णपदकही पटकावले.

भारताचे जेतेपद निश्चित झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत हरिकासह नागपूरकर दिव्या, महिला संघाचे कर्णधार अभिजित कुंटे, तसेच पुरुष संघातील डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि कर्णधार श्रीनाथ नारायणन यांची उपस्थित होती.

‘‘माझ्या सहकाऱ्यांपेक्षा मी अधिक भावुक झाले आहे. मी २० वर्षांपासून याच सुवर्णपदकासाठी खेळत होते आणि माझी ही प्रतीक्षा अखेर संपली याचा खूप आनंद आहे,’’ असे हरिका म्हणाली. ‘‘माझ्या सहकाऱ्यांच्या कामगिरीचाही मला अभिमान आहे. या सर्वच मुली खूप युवा आहेत. मात्र, त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करतानाच देशाला यश मिळवून दिले. माझी कामगिरी समाधानकारक झाली नाही, पण आमच्या संघातील अन्य खेळाडूंनी स्वत:चा सर्वोत्तम खेळ केला,’’ असे हरिकाने नमूद केले.

हेही वाचा >>>IND vs BAN : ‘ऋषभ पंतचे कसोटीतील पुनरागमन हे क्रिकेटच्या इतिहासातील…’, ॲडम गिलख्रिस्टचे वक्तव्य

गांधीनगर येथे नुकत्याच झालेल्या मुलींच्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपद मिळवलेल्या दिव्याने ऑलिम्पियाडमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. तिने सर्व ११ लढती खेळताना ९.५ गुणांची कमाई केली. त्यामुळे ती महिला संघातील सर्वांत यशस्वी खेळाडू ठरली.

‘‘आम्ही स्पर्धेची सुरुवात खूप चांगली केली. त्यानंतर मधल्या काही फेऱ्यांत आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, परंतु आम्ही या धक्क्यांचा ज्याप्रकारे सामना केला आणि त्यातून सावरलो हे कौतुकास्पद होते. मला आमच्या संघाचा अभिमान वाटत आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दलची भावना शब्दांत मांडणे अवघड आहे. मी खूप खूश आहे. वैयक्तिक पातळीवरही मी सर्वोत्तम खेळ करू शकले याचे समाधान आहे,’’ असे दिव्याने सांगितले.