स्थळ : अंधेरी क्रीडा संकुल. संकुलातील एका लहानशा खोलील बुद्धिबळ पटांची मांडणी केली होती. दोन टेबल एकमेकांना जोडलेली, अशी साधारण ६-७ संयुक्त टेबलांची रचना, प्रत्येक टेबलावर बुद्धिबळ पट, पण त्यावर रंगणारा शह-काटशहाच्या खेळात बराच बदल होता. कुणी समारोसमोर बसून खेळत होते, तर कुणी तिरपे बसून. पटावरील प्याद्याला स्पर्श करून तो ओळखायचा आणि मग आपली चाल खेळायची. प्रतिस्पर्धी अंशत: अंध असेल तर तो आपली चाल बोलायचा, मग संपूर्ण दृष्टिंहीन खेळाडूने त्यानुसार त्याच्या समोरील पटावर ती चाल खेळायची आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपला डाव खेळायचा. त्याचवेळी कोणता डाव खेळला, हे शेजारीच ठेवलेल्या कॅसेट रेकॉर्डरवर रेकॉर्ड करायचे. पटावरील एक एक प्याद्याला स्पर्श करून तो अचूक ओळखत समोरच्याला अडचणीत आणण्याच्या चाली रचल्या जात होत्या. हा असा डाव पाहताना या खेळाडूबद्दलचा आदर वाढतच होता. डोळस खेळाडू जितक्या सफाईने डाव मांडत नसतील तितका अचूकपणा या खेळाडूंमध्ये होता.

अंधांसाठी आयोजित त्या स्पर्धेत सामान्यांच्या डोळ्यांत अंजन घालेल अशा चाली रचल्या जात होत्या. बुद्धिबळ चाहत्यांसाठी ती एक पर्वणी होती. ६४ घरांच्या पटावर जणू हे अंध खेळाडू आपल्या जीवनाचा डाव मांडत होते आणि तोही अचूक. जणू तो पट त्यांच्या मेंदूत रेखाटला होता आणि त्याची हुबेहूब रेखाटणी हे खेळाडू करत होते. यात अंशत: अंध आणि संपूर्ण अंध अशी विभागणी होती, त्यांच्यासाठी असलेला पटही निराळा. पटावरील काळ्या मोहऱ्यांसाठीच्या जागेने हिरव्या रंगाने जागा घेतलेली आणि तीही पांढऱ्या जागेपेक्षा पटावर थोडीशी वर उंचावलेली. त्यामुळे त्यांना आपण कोणत्या चौकटीत चाल करतोय, याची कल्पना सहज यायची. त्यात मदतीला कोणत्या ओळीत कोणत्या प्याद्याची चाल करू शकतो, यासाठी पटाच्या बाहेरील बाजूला ब्रेल लिपीमध्ये करण्यात आलेले लिखाण. वरवर पाहता हे सर्व सोपे वाटत असले, तरीही त्यांचा खेळ पाहिल्यास या खेळाडूंसमोरील अडचणी, आव्हाने व तरीही त्यावर मात करण्याची त्यांची चिकाटी निदर्शनास येते.

भारताने क्रीडा क्षेत्रात बरीच प्रगती केलेली आहे. सामान्य खेळाडूंप्रमाणे दिव्यांगानाही सरकारी राजाश्रय मिळू लागला. त्यामुळे पदक जिंकण्याची आणि त्यामार्फत सरकारी बक्षीस पटकावण्याची स्पर्धाही वाढली. पण यात दुर्लक्षित राहिला तो अंध बुद्धिबळपटू. जगात जवळपास ६५-७० देशांमध्ये या बुद्धिबळपटूंना मान्यता दिलेली असताना भारतात अजूनही त्यावर विचारविमर्श सुरू झालेला नाही. बुद्धिबळ ऑलिम्पियाड, आशियाई स्पर्धा आणि अशा अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारताला पदक जिंकून देणाऱ्या या खेळाडूंना अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, हे दुर्दैव. त्यांच्यासाठी प्रशिक्षक नाहीत, समालोचकांकडून एखादा डाव ऐकायचा आणि तो आपल्या मेंदूत साठवायचा. अंध बुद्धिबळावरील पुरेशी पुस्तके उपलब्ध नाहीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक जिंकूनसुद्धा नोकरीची हमी नाही. सातत्यपूर्ण सराव, एकमेकांना डाव सांगून खेळात सुधारणा करायची, हेच त्यांच्या हाती असते. तरुणपणी जोश कायम आहे, तोपर्यंत खेळत राहायचे. परंतु जगण्यासाठी पैसा लागतो आणि या खेळातून तो उभा होऊ शकत नाही, याची जाण होताच खेळाला रामराम करून दैनंदिन व्यवहाराची घडी बसवण्याचा त्यांचा संघर्ष सुरू होतो. ही परिस्थिती अशीच राहिली तर त्यांचा संघर्ष पुढेही असाच सुरू राहील. पण एका पिढीने हार मानली तर लगेच दुसरी पिढी आहेच पुन्हा संघर्षांला तोंड द्यायला. आपल्यातील उणिवांचा बाऊ  न करता सतत झटत राहण्याच्या त्यांच्या या वृत्तीने सामान्यांना डोळस बनवले आहे,हे नक्की.

या संघटनेला मान्यता नसल्याची कल्पना नव्हती. मार्च महिन्यात माझ्यासह अन्य खेळाडू यासंदर्भात अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेशी चर्चा करू. या खेळाडूंना हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.         – अभिजीत कुंटे, भारताचे ग्रँडमास्टर

सामान्य खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसारच अंध बुद्धिबळपटूंना खेळावे लागते. आमच्या अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धामध्ये सामान्य खेळाडूंनाही पराभूत करण्याची किमया केलेली आहे. कोणताही मार्गदर्शक नाही, पुरेशी सुविधा नसताना आमचे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. मात्र सरकारकडून वर्षांतून एका स्पर्धा प्रवासाचा खर्च वगळता अन्य मदत मिळत नसल्याने त्यांचे मनोबल ढासळत आहे. बरेच खेळाडू बुद्धिबळ सोडण्याच्या तयारीत आहेत.  – चारुदत्त जाधव, अध्यक्ष अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना (अंध)

काही नावाजलेले अंध बुद्धिबळपटू

आर्यन जोशी, अश्विन मकवाना, दिप्तजीत डे, गौरव गडोदिया, किशन गांगोळी, क्रिष्णा उडुपा, प्रचुर्या कुमार प्रधान, शिरीष पाटील, सुभेंदू कुमार पात्रा, स्वप्निल शाह, युधजीत डे, सौंदर्या कुमार प्रधान

सलग पाच राष्ट्रीय जेतेपदे, पण..

कर्नाटकच्या किशन गांगोळीने सलग पाचव्यांदा राष्ट्रीय अंध बुद्धिबळ स्पध्रेचे जेतेपद पटकावले आहे. मात्र उदरनिर्वाहासाठी सरकारी कोटय़ातून नोकरी मिळत नसल्याने त्याने बुद्धिबळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेल लिपीतील पुस्तकांची निर्मिती

अंध खेळाडूंना बुद्धिबळ सहज शिकता आणि खेळता यावे यासाठी दृष्टिहिनांच्या अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेकडून पट बनवण्यात येतो, तसेच ब्रेल लिपीतून जवळपास ७० पुस्तके तयार करण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे संघटनेच्या या पुढाकाराचे जगभरातून कौतुक झाले आहे आणि या पुस्तकांना जगभरात मागणी आहे.

Story img Loader