वृत्तसंस्था, सिंगापूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा युवा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या तिसऱ्या डावात विद्यामान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनवर सहज सरशी साधली. बुधवारी झालेल्या या डावात काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या डिंगला वेळेचे गणित साधण्यात अपयश आले आणि अखेरीस त्याने हार मान्य केली.

जगज्जेतेपदाच्या लढतीतील सर्वांत युवा आव्हानवीर असणाऱ्या १८ वर्षीय गुकेशला पहिल्या डावातही पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळाली होती, पण त्याचा फायदा घेण्यात गुकेशला अपयश आले होते. मात्र, या चुकीतून धडा घेत त्याने दुसऱ्यांदा पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना अधिक परिपक्वतेने आणि पूर्ण तयारीनिशी खेळ केला. तीन डावांनंतर दोनही बुद्धिबळपटूंच्या नावे आता १.५-१.५ गुण झाले आहेत. गुरुवार हा विश्रांतीचा दिवस असल्याने गुकेशच्या विजयाचे महत्त्व अधिकच वाढते.

हेही वाचा >>>Prithi Shaw IPL Auction: पृथ्वी शॉने IPL लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर केलं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘ट्रोलिंगच्या पोस्ट मी पाहतो पण…’

‘‘मला खूप छान वाटते आहे. पहिल्या दोन डावांतील खेळाबाबतही मी आनंदी होतो. आज माझा खेळ अधिकच चांगला झाला. मी योग्य चाली रचू शकलो आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा दर्जेदार खेळ केला याचे निश्चितच समाधान आहे. मी जशी तयारी केली होती, त्यानुसारच १३व्या चालीपर्यंतचा खेळ झाला. त्यानंतर मला अधिक विचार करावा लागला, पण मी पटावर नियंत्रण राखले,’’ असे तिसऱ्या डावातील विजयानंतर गुकेश म्हणाला.

वेळेचा गुंता

तिसऱ्या डावात गुकेशने सुरुवातीपासूनच वर्चस्व मिळवले होते. गुकेशने केवळ चार मिनिटांतच १३ चाली रचल्या, तर डिंगला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी १ तास आणि ६ मिनिटांचा वेळ लागला. त्यानंतर वेळेचे गणित साधणे डिंगला अवघड होत गेले. जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिल्या ४० चालींसाठी १२० मिनिटांचा वेळ दिला जातो. गुकेशच्या चालींमध्ये सातत्य होते. अखेरच्या १२ चालींसाठी गुकेशकडे ४० मिनिटांचा वेळ शिल्लक होता, तर डिंगकडे १३ चालींसाठी केवळ १२ मिनिटे होती. अखेर हा गुंता सोडवणे डिंगला शक्य झाले नाही.

हेही वाचा >>>ICC Test Rankings: बुमराह नंबर वन कसोटी गोलंदाज, यशस्वी जैस्वालची कारकिर्दीतील उत्कृष्ट रँकिंग, ICC क्रमवारीत भारताचा दबदबा

क्वीन्स गँबिटचा अवलंब

गुकेश आणि डिंग यांच्यातील तिसऱ्या डावाला क्वीन्स गँबिट या प्रकाराने सुरुवात झाली. माजी जगज्जेत्या व्लादिमिर क्रामनिकने भारताच्या अर्जुन एरिगेसीविरुद्ध वापरलेल्या प्रकारास गुकेशने पसंती दिली. त्या वेळी अडखळत्या सुरुवातीनंतर एरिगेसीने लढत बरोबरीत सोडवली होती. गुकेशने या प्रकाराचा अवलंब करताना डिंगला अडचणीत टाकले. डिंगला प्रत्येक चालीपूर्वी खूप विचार करावा लागला. त्याच्याकडून चुकाही झाल्या आणि याचा गुकेशने पुरेपूर फायदा घेतला.

सुरुवातीला वजिरांची आदलाबदल झाल्यानंतर डावाच्या मध्यात डिंगला उंट वाचविण्यासाठी झगडावे लागले. डिंगने प्रत्युत्तराचा विचार केला, तेव्हा गुकेशने आपले मोहरे पटाच्या मध्यात आणत दबदबा राखला. त्यामुळे डिंगचा बराच वेळ गेला. अखेरच्या नऊ चालींसाठी डिंगकडे केवळ दोन मिनिटे शिल्लक होती. गुकेशने सफाईदार खेळ करताना काळ्या मोहऱ्यांचा राजा टिपण्याकडे कूच केले. त्यामुळे डिंगच्या अडचणी वाढल्या.

डिंगकडे अखेरच्या सहा चालींसाठी केवळ १० सेकंदांचा वेळ होता. त्यामुळे पुनरागमनाची शक्यता दिसत नसल्याने डिंगने ३७व्या चालीनंतर हार पत्करली.

जिंकत आलेला डाव जिंकणे सर्वांत कठीण असते असे अनेक महान खेळाडूंनी सांगितले आहे. ते धमन्यांतून रक्त नाही, तर बर्फ वाहतो असे ज्याच्याबाबत म्हटले जाते, त्या गुकेशला लागू पडत नाही. डिंगविरुद्ध तिसऱ्या डावात याचाच प्रत्यय आला. आतापर्यंतच्या जगज्जेतेपदाच्या लढतींमध्ये सगळ्यात जास्त वेळा खेळल्या गेलेल्या क्वीन्स गँबिट या प्रकाराने गुकेश-डिंग यांच्या तिसऱ्या डावाची सुरुवात झाली. पहिल्या डावात दिसलेला आत्मविश्वास डिंगमध्ये यावेळी दिसत नव्हता. कार्ल्सबाड या कॅलिफोर्नियामधील निसर्गरम्य गावाच्या नावाने हा प्रकार ओळखला जातो. डिंगच्या १८व्या खेळीनंतर पारडे पूर्णपणे गुकेशच्या बाजूने झुकले होते आणि त्याने अपेक्षेप्रमाणे डाव खिशात घातला. डिंग प्रतिहल्ल्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे एका दिवसाच्या विश्रांतीनंतर होणाऱ्या चौथ्या डावातही गुकेशला लक्षपूर्वक खेळ करावा लागेल. – रघुनंदन गोखलेद्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess world championship dommaraju gukesh defeats china ding liren sport news amy