Chess World Cup 2023 Final : बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा तरबेज बुद्धिबळपटू प्रज्ञानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात लढत सुरु आहे. दुसऱ्या दिवशी नवा चॅम्पियन न मिळाल्याने गुरुवारी नवा चेस चॅम्पियन मिळणार आहे. मंगळवारी अंतिम फेरीचा पहिला डाव ३५ चाली झाल्यानंतर अनिर्णित राहिला. त्यानंतर आजही हा डाव अनिर्णित राहिला त्यामुळे आता हा सामना उद्या होणार आहे आणि टायब्रेकवर निर्णय दिला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अझरबैजानच्या बाकू या ठिकाणी ही लढत रंगली आहे. बुधवारी प्रज्ञानंद काळ्या मोहऱ्यांसह खेळला. मात्र दुसरा डावही अनिर्णित राहिला त्यामुळे टायब्रेकरद्वारे विजेता निश्चित केला जाणार आहे. प्रज्ञानंद आणि कार्लसन यांच्यातल्या अंतिम फेरीचा दुसरा सामना अनिर्णित राहिला. ३० चालीनंतर दोघांनीही बरोबरी साधली.

मंगळवारी काय घडलं?

भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने मंगळवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनविरुद्धचा पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला. भारताच्या १८ वर्षीय प्रज्ञानंदने स्वत:च्याच वेगळय़ा शैलीच्या खेळाने आपल्यापेक्षा सरस असलेल्या अव्वल मानांकित कार्लसनला ३५ चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले.

प्रज्ञानंद ‘कॅन्डिडेट्स’साठी कसा पात्र ठरला?

प्रज्ञानंदने विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील संघर्षपूर्ण झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारताच्याच अर्जुन एरिगेसीवर मात केली. प्रज्ञानंदने ‘सडन डेथ टायब्रेकर’मध्ये विजय नोंदवला. या विजयासह त्याने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. प्रज्ञानंदसह पाच वेळचा जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, अझरबैजानचा निजात अबासोव आणि अमेरिकेचा फॅबिआनो कारूआना या बुद्धिबळपटूंनीही विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. या चारपैकी तीन बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरणार हे निश्चित होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकल्यानंतर कार्लसनने आपण ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘‘मी ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळणार नाही हे सर्वांनी गृहीत धरावे. त्यामुळे विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारे अन्य सर्व बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरतील,’’ असे कार्लसन म्हणाला. त्याने माघार घेतल्यामुळे प्रज्ञानंद, कारूआना आणि अबासोव या तिघांचा ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chess world cup final 2023 final praganandan and carlsons second game also a draw now the tiebreaker will be the champion scj
Show comments