नवी दिल्ली : एका वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी शुक्रवारी अखिल भारतीय निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.‘‘चेतन यांनी ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आणि शहा यांनी राजीनामा स्वीकारला आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’नंतर चेतन यांना आपले पद राखणे अवघडच जाणार होते. त्यामुळे त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला. त्यांना तशी सूचना करण्यात आली नव्हती,’’ असे ‘बीसीसीआय’मधील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
कोलकाता येथे रणजी करंडकाचा अंतिम सामना सुरू असून गुरुवारी पहिल्या दिवशी चेतन शर्मा आणि निवड समितीमधील अन्य चार सदस्य स्टेडियममध्ये उपस्थित होते. परंतु शुक्रवारी सकाळी चेतन यांनी आपण निवड समितीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचे ‘बीसीसीआय’ला कळवले. त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ते कोलकाताहून दिल्लीसाठी रवाना झाले. त्यांनी विमानतळावर समाजमाध्यमांशी संवाद साधणेही टाळले.
एका वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’दरम्यान चेतन शर्मा बरेच वादग्रस्त खुलासे करताना दिसले होते. पूर्ण तंदुरुस्त नसतानाही भारतीय खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी विशिष्ट ‘इंजेक्शन’चा वापर करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकेत जसप्रीत बुमराच्या समावेशावरून संघ व्यवस्थापन आणि बुमरा यांच्यात मतभेद झाले होते. तेव्हापासून बुमरा अजूनही संघाबाहेर आहे, असेही चेतन म्हणाले. माजी कर्णधार विराट कोहली आणि ‘बीसीसीआय’चा माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्यातही वाद होता, असा दावाही चेतन यांनी केला होता.