भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. झी न्यूजने अलिकडेच चेतन शर्मा यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. या स्टिंग ऑपरेशनदरम्यान शर्मा यांनी अनेक खळबळजनक दावे आणि आरोप केले होते. ज्यामुळे भारतीय क्रिकेट हादरलं आहे. परिणामी शर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. शर्मा यांनी बीसीसीआयसोबतचा करारनामा मोडला आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत देखील बीसीसीआयने शर्मा यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. परंतु त्यांनी राजीनामा देण्याचा पर्याय स्वीकारला. त्यांनी असं का केलं याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. रोहित शर्मा, राहुल द्रविडसह टीम मॅनेजमेंट चेतन शर्मांच्या राजीनाम्यामागचं कारण आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
चेतन शर्मा यांनी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातला वाद, कोहलीचं कर्णधारपद, जसप्रीत बुमराहचं संघातलं पुनरागमन, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यातली बातचित, याबाबत अनेक खुलासे केले होते. परंतु यापैकी सर्वात मोठा गोंधळ उडाला तो वेगळ्याच खुलाशाने. चेतन शर्मा म्हणाले की, “भारतीय खेळाडू फिट होण्यासाठी इंजेक्शन घेतात.”
शर्मा यांनी संघ व्यवस्थापनाचा विश्वास आधीच गमावला होता. तसेच स्टिंग ऑपरेशननंतर त्यांनी बीसीसीआयचा विश्वासदेखील गमावला. स्टिंग ऑपरेशननंतर एक सवाल होता की, आता खेळाडू चेतन शर्मा यांच्यासोबत मनमोकळेपणाने बोलू शकतील का? कारण त्यांनी खेळाडूंसोबतची बातचित माध्यमांसोबर मांडली होती. निवडकर्ते हे नेहमी कर्णधार, प्रशिक्षक आणि संघातील खेळाडूंशी बोलत असतात. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड नेहमी त्यांच्यासोबत चर्चा करायचे. राहुल आणि रोहित आता चेतन शर्मांसोबत संघातली एखादी गोष्ट शेअर करू शकतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे ही वाचा >> Women’s T20 WC मध्ये भारताच्या सामन्यापूर्वी भूकंप, स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने जागतिक क्रिकेटला हादरा
…म्हणून निवडला राजीनाम्याचा मार्ग
इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार संघ व्यवस्थापनातील काही सदस्यांचं म्हणणं आहे की, “शर्मा यांनी खेळाडूंच्या आणि बीसीसीआयमधल्या अंतर्गत गोष्टी चव्हाट्यावर मांडल्या. इंजेक्शनबाबतची गोष्ट जगजाहीर केल्यानंतर त्यांनी खेळाडूंचा विश्वास गमावला आहे. त्यामुळेच शर्मा यांनी राजीनामा देण्याचा पर्याय स्वीकारला. संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक आणि कप्तानाचा विश्वास गमावल्याने चेतन शर्मांना आपली बाजू मांडण्याऐवजी पद सोडणं अधिक योग्य वाटलं असावं.”