Cheteshwar Pujara Statement On Indian Test Cricket Team : भारताच्या कसोटी संघातून बाहेर पडणं, हा एक एक निराशाजनक अनुभव होता, अलं अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने म्हटलं आहे. ३५ वर्षीय या फलंदाजाला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात स्थान मिळालं नव्हतं. भारतासाठी १०३ कसोटी खेळणाऱ्या पुजाराने राष्ट्रीय संघासाठी द ओवल मैदानात ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्याने १४ आणि २७ धावा केल्या होत्या.
पुजाराने फायनल वर्ड पॉडकास्टशी बोलताना म्हटलं, “मागील काही वर्षात चढ-उतार पाहायला मिळाले. एक खेळाडूच्या रुपात ही एकप्रकारची परीक्षा असते. कारण ९० हून अधिक कसोटी सामने खेळल्यानंतरही मला स्वत:ला आताही सिद्ध करावं लागतं. मला आताही सिद्ध करावं लागतं की, या जागेवर राहण्याचा मला हक्का आहे. हे एक वेगळ्या प्रकारचं आव्हान आहे. टीममधून बाहेर झाल्यानंतर कधी कधी मला अस्थिर झाल्यासारखं वाटतं. ९० हून अधिक कसोटी सामने खेळून आणि पाच-सहा हजार धावा केल्यानंतर स्वत:ला सिद्ध करावं लागत आहे. हे सोपं नाहीय. खरंच तुम्ही सक्षम आहात का? कधी कधी अशाप्रकारची शंकाही मनात येते. इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये ससेक्सकडून खेळणाऱ्या पुजाराने म्हटलं, जर तुम्हाला सतत स्वत:ला सिद्ध करावं लागत असेल, तर तुम्ही विचार कराल की, असं करणं गरजेचं आहे का.”
पुजाराने घरेलू क्रिकेटच्या सामन्यांत तीन शतक ठोकले आहेत. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने दुलीप ट्रॉफीत पश्चिम क्षेत्राकडून खेळताना मध्य क्षेत्राविरोधात १३३ धावा केल्या. त्यांनी वनडे कपमध्ये ससेक्सकडून नॉर्थम्पटनशर आणि समरसेटविरोधात अनुक्रमे नाबाद १०६ आणि ११७ धावा केल्या. पुजाराने पुढं बोलताना म्हटलं, मला माहित आहे की, मी भारतीय क्रिकेटला ज्या प्रकारे योगदान दिलं आहे, ते पाहता मला अजूनही खूप योगदान द्यायचं आहे. काही वेळेपूर्वी मला सांगण्यात आलं होतं की, जेव्हा मी भारतीय टीमसाठी ७० किंवा ८० हून अधिक धावा केल्या. त्यावेळी जवळपास ८० टक्के वेळा भारताचा विजय झाला. संघात निवड होण्याबाबत मी विचार करत नाही. माझं लक्ष चांगली कामगिरी करण्यावर असणार आहे.