भारताचा शैलीदार कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. पुजाराने या हंगामात पाच प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये ससेक्ससाठी ७२० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन शतके आणि दोन द्विशतकांचा समावेश आहे. त्या कामगिरीच्या बळावर त्याला भारतीय कसोटी संघात परत येण्यास मदत झाली. चेतेश्वर पुजाराचे नुकतेच भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकमेव पुनर्निर्धारित कसोटी सामन्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात करोनाव्हायरसच्या संकाटामुळे भारतीय संघाने ही मालिका अपूर्ण सोडली होती. या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर पुजारा आपल्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. चेतेश्वर पुजाराने पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्म रिझवान बुधवारी (१ जून) ३० वर्षांचा झाला. त्यानिमित्त पुजाराने ट्विट करून त्याला शुभेच्छा दिल्या. ‘हॅपी बर्थडे मोहम्मद रिझवान. येणारे वर्ष तुझ्यासाठी चांगले जावो’, असे ट्विट त्याने केले आहे. पुजारा आणि रिझवान दोघेही ससेक्स क्रिकेट क्लबसाठी खेळतात. दोघांमध्ये चांगली मैत्री असून त्यांच्या मैत्रीची नेहमी चर्चा असते.

मोहम्मद रिझवाननेदेखील यापूर्वी पुजाराच्या अंगी असलेला संयम आणि एकाग्रतेबद्दल त्याचे कौतुक केले होते. रिझवान म्हणाला होता की, ‘चेतेश्वर पुजारा खूप चांगली व्यक्ती आहे. त्याची एकाग्रता अतुलनीय आहे. जर एखाद्याला त्यांच्याकडून काही शिकण्याची संधी मिळाली तर नक्कीच त्यांच्याकडून शिकून घेतले पाहिजे. एकाग्रतेच्या बाबतीत मी जे तीन खेळाडू सर्वोत्तम मानतो त्यामध्ये युनूस भाई आणि फवाद आलमसह पुजाराचाही समावेश होतो. काउंटीतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मी शरीरापासून दूर शॉट्स खेळत होतो. त्यामुळेच मी दोनदा अशाच प्रकारे आऊट झालो. त्यानंतर सरावाच्या वेळी मी पुजाराकडे गेलो. त्याने मला मार्गदर्शन केले.’

भारत-पाकिस्तानचे संघ क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यामुळे पुजारा आणि रिझवानची मैत्री चर्चेत आली आहे.