Cheteshwar Pujara breaks Brian Lara record in Ranji Trophy 2024-25 : भारताचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा स्ध्या कसोटी संघातून बाहेर आहे. त्याने छत्तीसगड शतक झळकावत मोठा पराक्रम केला आहे. त्याने ब्रायन लाराचा विक्रम मोडत भारतीय संघातील दावा भक्कम केला आहे. तो सध्या रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळत आहे. त्याबरोबर पुजाराने शतक झळकावत आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले आहे. त्याने आपले शतक १९७ चेंडूत पूर्ण केले.

पुजाराने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील झळकावले ६६ वे शतक –

चेतेश्वर पुजारा सध्या १३८ धावा करून क्रीजवर उपस्थित आहे. या खेळीत त्याने १५ चौकारही मारले. पुजाराच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे ६६ वे शतक आहे. यासह त्याने दिग्गज ब्रायन लाराला मागे टाकले आहे. लाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६५ शतके झळकावली होती. भारतासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी सर्वाधिक शतके झळकावली आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या नावावर ८१-८१ शतके आहेत.

प्रथम श्रेणीत सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू –

छत्तीसगडविरुद्ध शतक झळकावल्यानंतर चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २१००० धावा पूर्ण केल्या आहेत. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी भारतासाठी प्रथम श्रेणीत त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. भारतासाठी प्रथम श्रेणीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी २५८३४ धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Kagiso Rabada : कागिसो रबाडाने केला विश्वविक्रम! बांगलादेशविरुद्ध नोंदवला ‘हा’ खास पराक्रम

पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

चेतेश्वर पुजाराने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या १७६ डावांमध्ये त्याने ४३.६० च्या सरासरीने ७१९५ धावा केल्या आहेत. या कालावधीत, त्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २०६* धावा आहे. याशिवाय पुजाराने वनडेच्या ५ डावात ५१ धावा केल्या.