कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरच्या दिवशी चेतेश्वर पुजाराने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. कसोटी सामन्यात पाच दिवस फलंदाजी करण्याचा पराक्रम पुजाराच्या नावे झाला आहे. कसोटी सामन्यात पाच दिवस फलंदाजी करणारा पुजारा क्रिकेट जगतातील नववा तर भारतीय संघातील तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी भारताचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री आणि एम एल जयसिम्हा यांनी हा पराक्रम केला होता.

१९६० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात जयसिम्हा यांनी कोलकाताच्या मैदानात पाच दिवस फलंदाजी केली होती. तर रवी शास्त्री यांनी १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पाच दिवस फलंदाजी केली होती. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावाला सुरुवात केली. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी केवळ ११.५ षटकांचा खेळ झाला. पहिल्या दिवसाअखेर भारताने ३ बाद १७ धावा केल्या होत्या. यावेळी पुजारा नाबाद ८ धावावर खेळत होता. दुसऱ्या दिवशी डावाला सुरुवात झाल्यानंतर पुजारा ४८ धावा करुन नाबाद राहिला. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर तो ५२ धावांवर बाद झाला.

चौथ्या दिवशी शिखर धवन बाद झाल्यानंतर पुजारा पुन्हा मैदानात उतरला. चौथ्या दिवसाचा डाव संपला त्यावेळी पुजारा दोन धावांवर नाबाद होता. पाचव्या दिवशी त्याने भारताच्या डावाला सुरुवात केली. मैदानात उतरताच पाच दिवस फलंदाजी करण्याचा अनोखा विक्रम त्याच्या नावे झाला. दुसऱ्या डावात पुजाराने २२ धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या जेफरी बॉयकॉटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ऑस्ट्रेलियाच्या क्युमी ह्युजने इंग्लंडविरुद्ध, इंग्लंडच्या अॅलन लॅम्बने वेस्ट इंडिजविरुद्ध, वेस्ट इंडिजच्या अॅड्रियन ग्रिफिथने न्यूझीलंडविरुद्ध, एंड्रयू फ्लिंटॉफने भारताविरुद्ध तर दक्षिण आफ्रिकेच्या अल्विरो पीटरसनने न्यूझीलंडविरुद्ध पाच दिवस फलंदाजी करण्याचा पराक्रम केला होता.

Story img Loader