Cheteshwar Pujara’s Father’s Reaction: भारतीय कसोटी संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराला वेस्ट इंडिज दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून डच्चू देण्यात आले आहे. पुजाराच्या जागी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आता पुजाराच्या वडिलांनी त्याला कसोटी संघातून वगळल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पुजाराच्या वडिलांनी सांगितले की, “तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे.”
माझा मुलगा पुनरागमन करू शकत नाही यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही – अरविंद पुजारा
पुजाराच्या वडिलांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पुजाराला कसोटी संघातून वगळल्यानंतर सूचक विधान केले. चेतेश्वर पुजाराचे वडील म्हणाले, “पुजारा मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. मी त्याच्या निवडीवर भाष्य करू शकत नाही, परंतु दुलीप करंडक संघ जाहीर झाल्यानंतर तो नेटमध्ये कठोर परिश्रम घेत आहे आणि कौंटीकडूनही खेळत राहील. एक वडील आणि प्रशिक्षक या नात्याने तो पुनरागमन करू शकत नाही या अशा अनावश्यक गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे कारण नाही. ३५ वर्षीय माझा मुलगा गेले अनेक वर्षे देशासाठी खेळला असून त्याच्यावर अशी शंका उपस्थित करणे चुकीचे आहे.”
पुजाराला वगळल्यानंतर प्रश्न उपस्थित झाले
पुजाराला वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या यादीत सुनील गावसकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. ते म्हणाला की, “पुजाराचे लाखो फॉलोअर्स नाहीत, जे त्याच्यासाठी नारे लावू शकतील, पाठिंबा देऊ शकतील पण तो नक्कीच एक गुणी खेळाडू असून सध्या त्याचा फॉर्म खराब आहे त्यामुळे त्याला वगळण्यात आले. मात्र, रोहित आणि विराट यांचीही कामगिरी फारशी चांगली नाही. त्यामुळे जो नियम पुजाराला तोच नियम या दोघांना लागू व्हायला हवा होता.”
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खराब कामगिरी
अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला २०९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात पुजारा फलंदाजीत पूर्णपणे अपयशी दिसला. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने २५ चेंडूत १४ धावा केल्या तर दुसऱ्या डावात त्याने ४७ चेंडूत २७ धावा केल्या.
पुजाराचे ‘मिशन कमबॅक‘ सुरू
संघात ना घेण्याचे कारण काहीही असो पण, पुजाराने पुन्हा टीम इंडियात परतण्यासाठी सराव करण्यास सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्याची बातमी समजल्यानंतरच त्याने लगेचच प्रशिक्षण सुरू केले. सध्या त्याची दुलीप ट्रॉफीसाठी तयारी सुरू आहे, ज्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पुजाराची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पुजाराने आतापर्यंत १०३ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांच्या १७६ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ४३.६०च्या सरासरीने ७१९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १९ शतके आणि ३५ अर्धशतके झळकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २०६* धावा आहे. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५१ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २७ आहे.