भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा अत्यंत चतुर आणि कल्पक गोलंदाज असल्याने काही नवीन क्लुप्ती वापरून तो ऑस्ट्रेलियन फलंदाजीवर वर्चस्व गाजवेल, असा विश्वास भारताचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियातील यापूर्वीच्या कसोटी मालिकांमध्ये अश्विनला फारसे यश मिळाले नव्हते. आतापर्यंत खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांमध्ये अश्विनने ५४.७१ च्या सरासरीने २१ बळी मिळवले आहेत. ‘‘अश्विनने यंदा वॉर्विकशायरकडून खेळतानाही अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली आहे.

अश्विन हा अत्यंत चतुर गोलंदाज असल्याने तो फलंदाजाला आधीच रोखतो. त्या दृष्टीने तो गोलंदाजीत बदल करण्यात पटाईत असून त्याचे बदल मला सांगता येणार नाहीत; परंतु त्याने काही तांत्रिक बदल केले असून त्याचा त्याला चांगला फायदा होत आहे. अश्विन यापूर्वी ऑस्ट्रेलियात २०१४-१५ सालीदेखील खेळला असल्याने त्या अनुभवाचा त्याला फायदा होणार असल्याची आम्हाला खात्री आहे. भारतीय फलंदाजीचा सर्वाधिक दबाव विराट कोहलीवर पडतो, असे म्हणणे योग्य नाही. संपूर्ण संघ हा सांघिक भावनेने खेळत असतो. प्रत्येक जण आपापल्या परीने सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे भारताचे अन्य फलंदाजही तितकीच चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहेत,’’ असेही पुजाराने सांगितले.

Story img Loader