खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने स्वीकारला आहे. प्रशासकीय समिती खेळाडूंच्या मानधनाचा आराखडा नव्याने बनवणार आहे. पण त्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फक्त कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराची मानधनाच्या आराखडय़ात ‘अ’ श्रेणी कायम असावी, असे मत व्यक्त केले आहे.

प्रशासकीय समितीबरोबरच्या बैठकीला भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यासह शास्त्रीदेखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये खेळाडूंचे मानधन आणि आगामी वर्षांतील क्रिकेटचे वेळापत्रक यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर खेळाडू किती आंतरराष्ट्रीय सामने खेळतात, त्यावर त्यांचे मानधन आणि आराखडय़ातील दर्जा ठरवण्यात यावा, अशी चर्चा सुरू होती. सध्याच्या घडीला पुजारा हा फक्त कसोटी क्रिकेटमध्येच भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंपेक्षा त्याचे आंतरराष्ट्रीय सामने कमी होतील आणि त्यानुसार त्याचा आराखडय़ातील दर्जा बदलला जाऊ शकतो. हे सारे पाहता शास्त्री यांनी केलेले विधान सूचक आहे. कारण आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये पुजाराकडून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली आहे. पण एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याला देशाचे प्रतिनिधित्व करायची फारशी संधी मिळालेली नाही.

चेतेश्वर पुजारासारख्या खेळाडूची मानधनाच्या आराखडय़ातील ‘अ’ श्रेणी कायम ठेवण्यात यावी, असे शास्त्री यांनी सांगितले.

धोनी आणि कोहली एकमेकांचा आदर करतात

कोहली आणि धोनी यांच्यामध्ये चांगले संबंध नसल्याची चर्चा होत असली तरी ही गोष्ट खरी नाही. कोहली आणि धोनी या दोघांची शैली भिन्न आहे. धोनी शांत स्वभावाचा आहे, तर कोहली अधिक परिपक्व होत आहे. पण हे दोघे एकमेकांचा नेहमीच आदर करतात, असे शास्त्री यांनी सांगितले.

Story img Loader