Cheteshwar Pujara’s brilliant century against Manipur : भारतीय कसोटी संघातून वगळलेला अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आपल्या उत्कृष्ट कामगिरीने निवडकर्त्यांना सतत आठवण करून देत आहे की, त्याला दीर्घकाळ संघाबाहेर ठेवता येणार नाही. पुजारा सध्याच्या रणजी ट्रॉफी हंगामात सातत्याने धावा करत आहे. पुजाराने मणिपूरविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याने १०५ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०८ धावा केल्या. अशा प्रकारे राजकोटमध्ये पुजाराची ‘बॅझबॉल’ शैली पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याआधी मागच्या सामन्यातही त्याने राजस्थानविरुद्ध पहिल्या डावात शतक झळकावले होते. चेतेश्वर पुजाराने राजकोटच्या सनोसारा क्रिकेट मैदानावर आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील ६३ वे शतक झळकावले. पुजाराने १०२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पुजाराच्या संथ स्ट्राईक रेटवर नेहमीच टीका होत असते, पण आजची खेळी पाहून त्याच्या टीकाकारांचीही तोंडे बंद झाली असतील.

रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये पुजाराचे वर्चस्व –

या वर्षी, पुजाराने रणजी ट्रॉफीमध्ये २४३*, ४९, ४३, ४३, ६६, ९१, ३, ०, ११०, २५ आणि १०८ धावा खेळल्या आहेत. पुजाराच्या या खेळी पाहता तो भारतीय संघात पुनरागमन करण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते. मागील सामन्यापूर्वी त्याने ७ सामन्यात ६७३ धावा केल्या होत्या. या काळात त्याची सरासरी ७७ होती.

हेही वाचा – IND vs ENG : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताकडे ३२२ धावांची आघाडी, ‘यशस्वी’ खेळीनंतर जैस्वाल रिटायर्ड हर्ट!

सौराष्ट्राने ६ बाद ५२९ धावांवर डाव घोषित केला –

पहिल्या डावात मणिपूरला १४२ धावांत गुंडाळल्यानंतर सौराष्ट्राने पहिला डाव ६ गडी बाद ५२९ धावांवर घोषित केला. सौराष्ट्रसाठी पहिल्या डावात चेतेश्वर पुजारासह कर्णधार अर्पित वसावडा आणि प्रेरक मंकड यांनी शतकी खेळी खेळली. अर्पितने १९७ चेंडूत १४८ धावा केल्या. तर प्रेरकने १७३ चेंडूत १७३ धावा केल्या. दुसऱ्या डावात मणिपूरची अवस्था वाईट आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मणिपूरने दुसऱ्या डावात ५५ धावांत ३ विकेट गमावल्या आहेत.

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : यशस्वी जैस्वालचा कसोटीमध्ये ‘वनडे स्टाईल’ धमाका, शतकी खेळी करत इंग्लिश गोलंदाजांना फोडला घाम

चेतेश्वर पुजारा पोहोचला तिसऱ्या स्थानावर –

चेतेश्वर पुजाराने या रणजी मोसमात झारखंडविरुद्ध नाबाद २४२ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीयांमध्ये पुजारा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत दिग्गज सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघांच्या नावावर ८१-८१ शतके आहेत, तर दुसऱ्या स्थानावर राहुल द्रविड आहे. ज्याने 68 शतके केली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheteshwar pujara signaled his return to team india with a brilliant century against manipur in ranji trophy vbm
Show comments