एकीकडे भारतीय संघाला चेतेश्वर पुजारासारख्या उत्तम फॉर्मात असलेल्या अनुभवी खेळाडूची आवश्यकता आहे. पण विशाखापट्टणम पासून शेकडो किलोमीटर दूर सोलापुरात चेतेश्वर पुजारा शुक्रवारपासून खेळताना दिसणार आहे. रणजी करंडक स्पर्धेचा महाराष्ट्र आणि सौराष्ट्र सामना सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील हैदराबाद इथे झालेली पहिली कसोटी गमावली. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी शिलेदारांशिवाय खेळण्याची भारतीय संघासाठी ११ वर्षानंतरची वेळ होती. हैदराबाद कसोटीनंतर के.एल.राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघ एकदमच अनुनभवी भासतो आहे.

३६वर्षीय पुजाराने १०३ कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व केलं असून त्याच्या नावावर ७१९५ धावा आहेत. पुजाराच्या नावावर १९ शतकं आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजांना साहाय्य करणाऱ्या खेळपट्ट्यांवर तंत्रशुद्ध फलंदाजीचा वस्तुपाठ सादर करणारा पुजारा भारतीय संघासाठी तारणहार आहे. काही वर्षांपूर्वी भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देदिप्यमान विजय साकारला. या विजयात पुजाराने धीरोदात्तपणे फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नामोहरम केलं. पुजाराच्या संयमापुढे ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी आणि बोलंदाजीही सर्वसाधारण ठरली. गेल्या वर्षी जून महिन्यात ओव्हल इथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पुजारा खेळला होता. त्या सामन्यात पुजाराला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं.

Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Anganewadi Bharadi Devi Jatra celebrations with traditional rituals and vibrant festivities.
Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, ‘या’ दिवशी सुरू होणार उत्सव
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग

काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे झालेल्या विदर्भविरुद्धच्या लढतीत पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा ओलांडला. हा विक्रम करणारा पुजारा केवळ चौथा भारतीय खेळाडू आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या मांदियाळीत पुजाराने स्थान पटकावलं आहे. पुजाराने त्या सामन्यात ४३ आणि ६६ धावांची खेळी केली होती. सौराष्ट्रने त्या लढतीत विजय मिळवला होता.

हैदराबाद कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला अनुभवी खेळाडूंसंदर्भात विचारण्यात आलं. अनुभवी खेळाडूंनी वेळोवेळी निर्णायक योगदान दिलं आहे. त्यांचा अनुभव आणि कर्तृत्व आपण विसरूच शकत नाही. पण युवा खेळाडूंनाही संधी मिळायला हवी. त्यांना संधी मिळाली नाही तर ते त्यांचं कौशल्य कसं सिद्ध करणार असं रोहित शर्मा म्हणाला होता. हैदराबाद कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली पण भारतीय फलंदाज ढेपाळले. कसोटी पाचव्या दिवसापर्यंत नेण्याची संधी भारतीय संघाकडे होती. मात्र त्यांनी आततायीपणा करत सामना गमावला.

सौराष्ट्रचं नेतृत्व जयदेव उनाडकतकडे आहे. भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेला उनाडकत हा डोमेस्टिक क्रिकेटमधल्या अव्वल गोलंदाजांपैकी एक आहे. उनाडकतच्या नेतृत्वातच सौराष्ट्रने दोनवेळा रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं होतं. २०१० मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या उनाडकतने प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं होतं. आयपीएल स्पर्धेत उनाडकत ७ संघांकडून खेळला आहे.

या लढतीच्या निमित्ताने सोलापुरकरांना पुजारा, उनाडकत या खेळाडूंच्या बरोबरीने शेल्डॉन जॅक्सन, धर्मेंद्रसिंग जडेजा, चिराग जाणी, प्रेरक मंकड, अर्पित वसावदा या सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा खेळ पाहता येणार आहे. महाराष्ट्राच्या संघासाठी हे घरचं मैदान असणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा लाडका शिलेदार केदार जाधवकडे महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व आहे. केदारची फटकेबाजी पाहण्यासाठी सोलापुरकर उत्सुक आहेत. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणारा अंकित बावणे या सामन्याचं आकर्षण असणार आहे.

सौराष्ट्रचा यंदाच्या हंगामातला सलामीचा झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित झाला होता. हरयाणाविरुद्ध त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवाचा वचपा सौराष्ट्रने विदर्भविरुद्ध घेतला. या लढतीत त्यांनी २३८ धावांनी विजय मिळवला. सर्व्हिसेसविरुद्धचा सामना अनिर्णित झाला. सोलापुरात त्यांचा सामना तुल्यबळ महाराष्ट्राशी होणार आहे.

महाराष्ट्राने मणिपूरविरुद्ध एक डाव आणि ६९ धावांनी विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. झारखंडविरुद्धचा सामना अनिर्णित झाला. राजस्थानविरुद्ध महाराष्ट्राला पराभवाला सामोरं जावं लागलं. हरयाणाविरुद्धची लढतही अनिर्णित झाली.

Story img Loader