१५ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे. टी-२० मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली. या संघात कुलदीप यादव-युजवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. निवड समितीचे प्रमुथ एम.एस.के. प्रसाद यांनी दोन्ही खेळाडूंना संघात स्थान न मिळण्याबाबतचं कारण सांगितलं आहे.

अवश्य वाचा – संघात प्रवेश हवाय मग हे आव्हान पार पाडाच !

“भारतीय फिरकीपटू आक्रमणात वैविध्य यावं यासाठी आम्ही तरुण खेळाडूंना संधी देत आहोत. ऑस्ट्रेलियातील आगामी टी-२० विश्वचषक आमच्या डोळ्यासमोर आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात कुलदीप आणि चहलने मर्यादीत षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. मर्यादीत षटकांसाठी संघात चहल आणि कुलदीपचा नेहमी विचार केला जाईल. मात्र त्याआधी आम्ही नवीन खेळाडूंना संधीत देत आहेत.” India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यांनी दोन्ही खेळाडूंना संघात स्थान न मिळण्याचं कारण सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.