कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोने पिछाडीवरून आक्रमक खेळ करताना यजमान चिलीला ३-३ अशा बरोबरीत रोखले, तर बोलिव्हियाने पहिल्या विजयाची नोंद करताना इक्वेडोरचा ३-२ असा पराभव केला. ‘अ’ गटातील या लढतींनी आश्चर्यकारक निकाल नोंदवत प्रेक्षकांना अचंबित केले. बोलिव्हियाने १८ वर्षांनंतर या स्पध्रेत विजयाची चव चाखली.
स्पध्रेतील पहिल्याच लढतीत चिलीने इक्वेडोरवर २-० असा विजय मिळवून जेतेपदावर दावेदारी सांगितली होती. त्यामुळे मेक्सिकोविरुद्ध जिंकून उपांत्य फेरीत जागा पक्की करण्याच्या निर्धाराने यजमान मैदानात उतरले. युव्हेट्स क्लबचा स्टार खेळाडू अर्टुरो व्हिडाल याने दोन गोल करून चिलीला ३-२ अशा आघाडीवर ठेवले होते, परंतु ६६व्या मिनिटाला व्हिसेंटे वुओसोने सामना ३-३ असा बरोबरीत आणला. या लढतीतीत त्याचा हा दुसरा गोल होता. या बरोबरीने दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुणांवर समाधान मानावे लागले. चिलीकडून एडय़ुडरे व्हॅर्गास (४२ मि.) आणि मेक्सिकोकडून रॉल जिमेनेझ (२९ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
जुआन कार्लोस मेडिनाच्या क्रॉसवर वुओसोने २१व्या मिनिटाला गोल करून मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. मात्र, पुढच्याच मिनिटाला व्हिडालने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. २९व्या मिनिटाला मेक्सिकोने पुन्हा आघाडी घेतली. अ‍ॅटलेटिको माद्रिदचा स्ट्रायकर जिमेनेझने अ‍ॅड्रियन अल्ड्रेटेच्या पासवर गोल केला. ४२व्या मिनिटाला चिलीकडून त्याला उत्तर मिळाले आणि व्हॅर्गासच्या या गोलने सामन्यात २-२ अशी बरोबरी आणली.
मध्यंतरापर्यंत सामना बरोबरीत असल्याने दुसऱ्या सत्रात आणखी चुरशीचा खेळ पाहायला मिळेल याची खात्री चाहत्यांना होती. ५५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर व्हिडालने गोल करून सामन्यात पहिल्यांदा चिलीला आघाडीवर आणले. मात्र, हा आघाडीचा आनंद क्षणिक ठरला आणि ६६व्या मिनिटाला वुओसोने अप्रतिम गोल करून मेक्सिकोला बरोबरी मिळवून दिली. अखेपर्यंत हीच बरोबरी कायम राखण्यात मेक्सिकोने यश मिळवल्याने चिलीला दोन गुणांवरच समाधान मानावे लागले.

बोलिव्हियाचा १९९७ नंतरचा पहिला विजय
बोलिव्हियाने इक्वेडोरला नमवून २० वर्षांत आपल्या देशाबाहेर पहिला विजय मिळवला. तसेच हा त्यांचा १९९७ सालानंतरचा कोपा अमेरिका स्पध्रेतील पहिला विजय ठरला आहे. बोलिव्हियाने मध्यंतराला इक्वेडोरच्या कमकुवत बचावाचा फायदा उचलत ३-० अशी दमदार आघाडी मिळवली होती. कर्णधार रोनाल्ड रॅल्डेस (५ मि.), मार्टिन स्मेडबर्ग (१८ मि.) आणि मार्सेलो मोरेनो (४३ मि. पेनल्टी) यांनी गोलधडाका करताना इक्वेडोरला हादरवले. मात्र, मध्यंतरानंतर इक्वेडोर संघाने दमदार पुनरागमन करताना सामन्यात रंजकता निर्माण केली. इन्नर व्हॅलेंसियाने ४८व्या मिनिटाला इक्वेडोरसाठी पहिला गोल नोंदविला. या गोलने जागे झालेल्या बोलिव्हियाने सावध खेळ करत चेंडू जास्तीत जास्त वेळ स्वत:कडे ठेवला.
८१व्या मिनिटाला मिलर बोलानोसने गोल करून सामन्यात चुरस वाढवली. मात्र, त्यांना सामना बरोबरीत रोखण्यापासून बोलिव्हियाचा गोलरक्षक क्वीनोनेझने रोखले आणि बोलिव्हियाने ऐतिहासिक विजय साजरा केला.