चेन्नई खुली टेनिस स्पर्धा अर्थात भारतातील एकमेव एटीपी दर्जाच्या स्पर्धेला यंदा मारिन चिलिच आणि स्टॅनिस्लॉस वॉवरिन्का सहभागी होणार आहेत. जागतिक क्रमवारीत अव्वल वीस खेळाडूंत या दोघांचा समावेश आहे. टॉमस बर्डीच, जॅन्को टिप्सारेव्हिच यांच्यापाठोपाठ चिलिच आणि वॉवरिन्काच्या सहभागामुळे यंदा जेतेपदासाठी जबरदस्त चुरस रंगणार आहे.
क्रोएशियाच्या चिलिचने २००९ आणि २०१० मध्ये चेन्नई खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षीही तो जेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता. मात्र दुखापतीमुळे त्याला सहभागी होता आले नव्हते. वॉवरिन्कासाठी ही पाचवी चेन्नईवारी असणार आहे. जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी तो उत्सुक आहे.
२००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये वॉवरिन्काने फेडररच्या साथीने सुवर्णपदकावर कब्जा केला होता. ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. दोनवेळा चेन्नई खुल्या स्पर्धेचे जेतेपद जिंकणाऱ्या चिलिचच्या सहभागामुळे जेतेपदासाठीची चुरस वाढली असल्याचे तामिळनाडू टेनिस संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हितेन जोशी यांनी सांगितले.     

Story img Loader