हांगझो : ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशाच्या तीन खेळाडूंना चीनच्या प्रशासनाकडून प्रवेशपत्रिका नाकारण्यात आल्याने आशियाई क्रीडा स्पर्धाना सुरुवात होण्यापूर्वी नव्याच वादाला तोंड फुटले आहे. यामुळे भारतीय खेळाडूंच्या सहभागात चीनचाच अडथळा निर्माण झाला आहे. अरुणाचल प्रदेशातील न्यामन वांगसू, ओनिलू टेगा आणि मेपुंग लामगु या वुशू क्रीडा प्रकारातील तीन महिला खेळाडूंना चीनने मान्यता नाकारली आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश हा चीनचाच भाग असल्याचेच चीन म्हणत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> ICC Rankings: एकच नंबर! क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, जगात फक्त दोन संघांना जमला हा पराक्रम
आशियाई ऑलिम्पिक समितीचे हंगामी अध्यक्षपद सांभाळणाऱ्या रणधीर सिंग यांनी या तीन खेळाडूंची मान्यता नाकारण्याबाबत चिनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. भारताचा वुशू खेळातील आठसदस्यीय संघ शुक्रवारी चीनला रवाना होणार होता. मात्र, या तीन खेळाडूंना भारतातच थांबावे लागले आहे. या अडचणीनंतर आम्ही कार्यकारी समितीची बैठक घेतली असून, या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा केली, असे रणधीर सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा >>> IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम
भारताकडून तीव्र निषेध भारत सरकारने चीनच्या या कृतीबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चीनला जाण्यास नकार दिला आहे. चीनची कृती ही खेळभावना आणि अशियाई खेळांचे आयोजन करण्यासाठी असलेल्या नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे अरुणाचल प्रदेश येथील खासदार किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे. अरुणाचल प्रदेश हा वादग्रस्त प्रदेश नाही, तर भारताचा अविभाज्य भाग आहे. अरुणाचल प्रदेशातील जनता ही चीन करत असलेल्या दाव्याला विरोध करत आहे, असेही रिजिजू म्हणाले.