भारताची तरुण बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने जागतिक क्रमवारीत ३९ व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या साएना कावाकामीचा २१-१५, २१-१३ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. २०१६ साली सिंधूने चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. दुसरीकडे भारताची फुलराणी सायना नेहवालला मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोरियाच्या सुंग जी ह्यूनने संघर्षपूर्ण लढतीत सायनाचं आव्हान २२-२०, ८-२१, १४-२१ असं मोडून काढलं.
सिंधू आणि कावाकामीचा सामना पहिल्या सेटपासून चांगलाच रंगला होता. दोन्ही खेळाडू एकमेकींना मोठी आघाडी घेण्याची संधी देत नव्हत्या. अखेर सिंधूने आपला सर्व जोर लावत पहिल्या सेटमध्ये मध्यांतरापर्यंत १३-७ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने कावाकामीला सेटमध्ये पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये ६-० अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र कावाकामीने चांगली टक्कर देत ८-१० असं चांगलं पुनरागमन केलं. मात्र मध्यांतरापर्यंत सिंधूने २ गुणांची नाममात्र आघाडी कायम राखली.
यानंतर दुसऱ्या सेटमध्ये मध्यांतरानंतर सिंधूने वेळेतच स्वतःला सावरत सामन्यात आघाडी घेतली. अखेर २१-१३ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत सिंधूने सामना आपल्या नावे केला. दुसरकीडे पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या मनु अत्री आणि बी. सुमित रेड्डी जो़डीने चीन तैपेई जोडीचा १३-२१, २१-१३, २१-१२ असा पराभव करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूला आपला गाशा गुंडाळावा लागला होता, त्यामुळे २०१६ साली मिळवलेल्या विजेतेपदाची पुनरावृत्ती सिंधू यंदाच्या वर्षी करणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.